मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणाचे खरे मास्टरमाईंड धुळे येथील मूळ रहिवासी सुनील पाटील असल्याचा दावा मोहीत कंबोज- भारतीय यांनी केला आहे. तसेच या दाव्याच्या समर्थनार्थ मोहीत भारतीय यांनी सुनील पाटील आणि सॅम डिसूजा यांच्यात झालेल्या व्हॉट्सअॅप संभाषणाचे स्क्रीनशॉट पत्रकार परिषदेत ठेवले.
मोहीत भारतीय यांनी पत्रकार परिषद घेऊन सुनील पाटील या सर्व प्रकरणामागचे मास्टर माइंड असल्याचा दावा केला आहे. “के. पी. गोसावीचा फोटो देशभरात चर्चेत राहिला. किरण गोसावी शाहरुखच्या मुलासोबत सेल्फी घेताना दिसला. दुसऱ्या फोटोमध्ये किरण गोसावी भाजपाचा कार्यकर्ता असून आर्यन खानला खेचून एनसीबीमध्ये घेऊन जातोय असं दिसलं. पण या सगळ्या प्रकरणामागचा मास्टरमाईंड सुनील पाटील आहे, असं मोहीत भारतीय म्हणाले.
सुनील पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य आहे. हे धुळ्याचे आहेत. २० वर्षांपासून त्यापक्षासोबत संबंध राहिले आहेत. फक्त संबंधच नाही, तर नुकतेच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषीकेश देशमुख यांचे ते चांगले मित्र आहेत. राज्यात राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व नेते आणि मंत्र्यांचे त्यांच्याशी घरगुती संबंध आहेत. अनिल देशमुखांवर इडीची सुरू असलेल्या कारवाईत सुनील पाटील यांची भूमिका आहे. राज्याच्या गृहविभागात अधिकाऱ्यांची बदली करण्यासाठी सुनील पाटील पैसे घेत होते. सुनील पाटील राज्यात गृहविभागात बदलीचं रॅकेट चालवत होते. १९९९ ते २०१४पर्यंत सुनील पाटील यांचं रॅकेट अॅक्टिव्ह होतं. २०१४मध्ये सरकार बदलल्यानंतर ते अंडरग्राउंड झाले. २०१९नंतर सुनील पाटील पुन्हा महाराष्ट्रात, मुंबईच्या फाईव्ह स्टार हॉटेलांमध्ये बदल्यांचं रॅकेट चालवत आहेत. यात महाविकासआघाडीच्या अनेक मंत्र्यांचे त्यांच्याशी संबंध आहेत”, असं देखील ते म्हणाले. मोहीत भारतीय यांनी सुनील पाटील यांची आर्यन खान प्रकरणात नेमकी काय भूमिका आहे, याविषयी सविस्तर माहिती दिली.
कोण आहेत सुनील पाटील ?
सुनील चौधरी पाटील हे धुळ्याचे रहिवाशी असल्याची माहिती आहे. ते माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या अत्यंत जवळचा मानला जातो. बबनराव पाचपुते जेव्हा २००९ ते २०१४ मध्ये NCP मधून आमदार होऊन कॅबिनेट मंत्री झाले होते. त्यावेळी तो त्यांच्या बंगल्यावर नेहमी दिसायचा.
भाजप नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल
भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झालेल्या शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आमदार विनायक मेटे यांच्याशी देखील सुनील चौधरी पाटील यांची जवळीक होती. मात्र नंतर मेटेंशी काही वाद झाल्यानं ते दूर झाले. सुनील पाटील यांचे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी संबंध आहेत असा आरोप केल्यानंतर आता सुनील पाटील यांचे काही फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. यामध्ये सुनील पाटील भाजपचे गुजरातचे मंत्री किरीट सिंह राणा यांच्या सोबत आहे तर दुसऱ्या फोटो मध्ये मनीष भानुशाली आणि सुनील पाटील एकत्र पाहिला मिळत आहे.