मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधीमंडळातील लांबलेल्या मतमोजणीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी कोणी व का थांबवली? असा सवाल संजय राऊत यांनी केला. तसेच आधी ईडीचा डाव फसला, त्यामुळे भाजपाने आता रडीचा डाव सुरू केल्याचा आरोपही केला.
राऊत यांनी ट्विट करत म्हटलं, “राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे? ईडीचा डाव फसला, आता रडीचा डाव सुरू झाला! आम्हीच जिंकू! जय महाराष्ट्र!” तसेच अजय माकन यांचं ट्विट शेअर करत राऊत यांनी लिहिलंय, “महाराष्ट्रातही हाच खेळ सुरु आहे. सध्या राज्यात घाणेरडं राजकारण सुरु आहे”
अजय माकन यांनी ट्विट केलं की, राज्यसभा निवडणुकीच्या निकालात नामुष्की ओढवणार असल्याच्या भीतीनं-भाजपनं हरियाणात मतमोजणी थांबवून घाणेरडं राजकारण केलं आहे. भाजपचे आक्षेप फेटाळत रिटर्निंग ऑफिसरच्या निर्णयावर एक नजर टाका, असं म्हणत माकन यांनी रिटर्निंग ऑफिसरचं एक पत्र शेअर केलं आहे. तसेच भारतात लोकशाही अजूनही जिवंत आहे का? असा सवालही विचारला आहे.
















