मुंबई (वृत्तसंस्था) देशात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी मोठी घोषणा केली आहे. पेट्रोलचा दर प्रतिलिटर २०० रुपयांजवळ पोचल्यानंतर राज्यात दुचाकीवर ट्रिपल सीट जाण्यास आसाम सरकार परवानगी देणार आहे. त्यांच्या या घोषणेमुळे खळबळ उडाली आहे.
आसामचे भाजप प्रदेशाध्यक्ष भावेश कलिता यांनी ही घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे. ते म्हणाले की, पेट्रोलचा दर प्रतिलिटर २०० रुपयांजवळ पोचल्यानंतर राज्यात दुचाकीवर ट्रिपल सीट जाण्यास आसाम सरकार परवानगी देणार आहे. पेट्रोल २०० रुपयांवर गेल्यानंतर आम्ही दुचाकीवर ट्रिपल सीट जाण्यास परवानगी देऊ. याचबरोबर तिघे बसू शकतील, अशा दुचाकींचे उत्पादनही घेण्याची सूचना केली जाईल.
लोक इंधन बचतीसाठी लक्झरी कार चालवण्याऐवजी एकाच दुचाकीवर तिघे बसून जाण्यास प्राधान्य देतात, असे विधान कलिता यांनी केले होते. यावरून गदारोळ उडाल्यानंतर त्यांनी हा खुलासा केला आहे. दुचाकीवर ट्रिपल सीट अधिकृतपणे जाण्यास परवानगी देण्याची सरकारी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. यासाठी त्यांनी पेट्रोलचा दर प्रतिलिटर २०० रुपयांच्या जवळ जाण्याची अट घातली आहे. त्यांच्या या अजब घोषणेवरूनही आता वाद सुरू झाला आहे.
















