चाळीसगाव (प्रतिनिधी) एका माजी कार्यकर्त्याने काही दिवसापूर्वी चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरण करण्याच्या कामासंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते. तो कार्यकर्ता सध्या उबाठा गटाकडे गेल्याने उबाठाचे उमेदवार हेच त्याच्या करता करविता धनी असल्याचे आता उघड झाले आहे. त्यामुळे आरोप करणारे आता शिवरायांच्या पुतळ्यासमोर येवून माफी मागणार का? असा सवाल महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांनी केला असुन विरोधकांनी केलेल्या आरोपांची हवाच काढली आहे.
विधानसभा निवडणुकीचे मतदानासाठी अवघे तीन-चार दिवस उरले असताना आरोप प्रत्यारोप होत आहेत. शिवरायांच्या पुतळ्यावरून प्रश्न उपस्थित करणारे विरोधक छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन नाक घासून माफी मागावी असे देखील त्यांनी जाहीर आवाहन दिले. छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरण करण्यासाठी ५ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. वास्तविक सदर कामाची प्रशासकीय मान्यता ही ५ कोटी रुपयांची असून ३ कोटी ७६ लक्ष रुपयांचीच निविदा मंजूर झालेली आहे.
त्यातही राजमुद्रा शिल्प व ट्रॅफिक आयलँड संदर्भातील कामकाजावर फक्त २५ लाख रुपये खर्च झाले आहेत, उर्वरित खर्च हा स्टेशन रोड सेंट्रल बँक पासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रस्ता जोड, रस्ता चौक काँक्रिटीकरण, गटारीचे आरसीसी पाईप, धापे, डिव्हायडर, तस्सम पेवर ब्लॉक, फुटपाट, पथदिवे रोड फर्निचर इत्यादी कामांसाठी करण्यात येत आहे आहे. त्यामुळे राजमुद्रा शिल्प चौकासाठी ५ कोटी खर्च झाल्याच्या आरोपाची हवाच आता निघून गेल्याने जनतेलाही विरोधक दिशाभूल करत असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता देखील आता विरोधकांना प्रश्न विचारू लागले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या सुशोभीकरणाच्या मुद्द्द्यावर राजकारण करू पाहणाऱ्यांना जनता आता धडा शिकवणार ? असाही जनतेत बोलले जात आहे. आरोप करणारे काहीच बोलायला तयार नाही, त्यामुळे त्यांची गोची झाली आहे. विशेष म्हणजे या सर्व कामांची यादी शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून खोट्या व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्याचे काम उबाटा गटाकडून करण्यात येत असल्याचे आता या निमित्ताने उघड झाले आहे.