औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबादच्या (aurangabad) रमेश पाटील या व्यक्तीने बॅनरच्या माध्यमातून चक्क निवडणूक (election) लढवण्यासाठी बायको (wife) पाहिजे असा मजकूर लिहिल्याने विविध स्तरावर याबद्दल चर्चा सुरु आहे.
इच्छुक उमेदवार रमेश पाटील म्हणाले की, मला १ मुलगा आणि दोन मुली आहेत. लॉकडाऊनमध्ये मला एक मुलगी झाल्यानं आता मी निवडणूक लढण्यास पात्र नाही. त्यासाठी मी दुसरं लग्न करुन बायकोला निवडून आणण्याची शक्कल लढवली. मला सकाळपासून एक फोन आला त्यांनी सांगितले आमच्याकडे १५-१६ एकर जमीन आहे. निवडणुकीचा खर्चही द्यायला तयार असल्याचं म्हटलं परंतु मी अद्याप प्रतिसाद दिला नाही असं त्यांनी सांगितले. तसेच मी याआधी बाळासाहेबांचा शिवसैनिक होतो आणि नंतर राज ठाकरेंचा महाराष्ट्र सैनिक झालो अशीही माहिती रमेश पाटील यांनी दिली.
दरम्यान, या बॅनरवरून सकाळपासून राज्यभर चर्चेला उधाण आले आहे. दुपारी संतप्त भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी (Bjp) गुलमंडी, औरंगपुरा, पैठण गेट या बाजार पेठेतील बॅनरवर शाईफेक करीत बॅनर फाडला. भाजपच्या महिलांनी हे बॅनर शाईफेक करत फाडलेच, मात्र पाटील यांच्यावर आता त्वरीत कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अशा प्रकारे बॅनर लावण्याचा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. यामुळे महिलांचा अपमान होत आहे, असा आरोप भाजपच्या महिला कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. आता राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने अनेकांना इच्छा असूनही निवडणूक लढवता येत नाही, त्यामुळेच हा प्रकार समोर आला आहे.