जळगाव (प्रतिनिधी) चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील स्मिता अतुल महाजन (वय ४३) यांची शेअर मार्केटमध्ये अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ८ लाख ९३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महाजन यांच्याशी मोहीत शर्मा व आशिष भारद्वाज या व्यक्तींनी संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. सुरुवातीला त्यांनी थोडी गुंतवणूक केली असता, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर दोन ते अडीच लाखांचा नफा झाल्याचे भासवण्यात आले.
विश्वास संपादन करून महिलेला अधिक गुंतवणुकीस प्रवृत्त करण्यात आले. त्या अनुषंगाने त्यांनी युपीआय, बँक खात्यांद्वारे आणि बारकोड स्कॅन करून वेळोवेळी विविध रक्कम आरोपींकडे पाठविली. फसवणूक इतकी प्रगल्भ होती की त्यांनी स्वत:च्या खात्याबरोबरच कुटुंबातील इतर सदस्यांच्या खात्यांतूनही पैसे ट्रान्सफर केले. परंतु काही काळानंतर नफा मिळणे दूरच, मूळ गुंतवलेली रक्कमही परत न मिळाल्यामुळे त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. स्मिता महाजन यांनी याबाबत सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.