जळगाव (प्रतिनिधी) लग्नाचे अमिष दाखवित स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा खळबळ जनक आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला होता. त्यानंतर महिला तक्रार देण्याकरीता पोलीस ठाण्यात गेल्या, परंतू त्या तक्रार न देता आपण उद्या तक्रार देण्याकरीता येते असे सांगून माघारी परतल्या होत्या. त्यानंतर आज त्या महिलेने पोलीसांशी संपर्क साधून त्यांना आपण तक्रार देणार नसून तसे सायंकाळपर्यंत लेखी देण्याकरीता पोलीस ठाण्यात येईल असे सांगितले. मात्र रात्री उशिरापर्यंत ती महिला पोलीस ठाण्यात आलेली नव्हती.
तक्रार घेवून आलेल्या महिलेशी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी मैत्री करुन तिच्यासोबत जवळीक साधली. त्यानंतर महिलेला लग्नाचे अमिष देवून तिचे जळगाव, धुळे व नाशिक येथे नेवून तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला. पीडि महिला या तक्रार देण्यासाठी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात थांबून होत्या. मात्र रात्री महिलेने गुन्हा दाखल करण्यास नकार देत आपण उद्या तक्रार देण्याकरीता येणार असल्याचे सांगत त्या पोलीस ठाण्यातून निघून गेल्या. मात्र दुसऱ्या दिवशी शनिवारी ती पीडित महिला तक्रार देण्याकरीता आल्या नाही.
पोलीस निरीक्षक गेले वैद्यकीय रजेवर
महिलेवर लैंगिक शोषण केल्याचे आरोप झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांची उलबांगडी करुन त्यांची नियंत्रण कक्षात नियुक्ती करणत आली. त्यानंतर ते आता पंधरा दिवसांच्या वैद्यकीय रजेवर गेले आहेत.
त्या दोघांची होणार चौकशी
महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी त्या दोघांवर आ. मंगेश चव्हाण यांनी मदत केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ते दोघेही जळगावातून निघून गेले असून त्यांची पोलिसांकडून चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
पोलिसांनी घेतला त्या दोघांचा शोध
या प्रकरणात पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना दोन जणांनी मदत केल्याचा आरोप केला होता. तसेच त्या दोघांकडे शस्त्र परवाना कशासाठी असून त्या दोघांचा असा कोणता व्यवसाय आहे असा प्रश्न आ. चव्हाण यांनी बैठकीत केला होता. त्यानंतर शनिवारी दोघांना चौकशीसाठी बोलवायचे असल्याने पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. परंतू पोलिसांनी त्यांचा शोध घेतल्यानंतर ते दोघे जळगावात नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलिसात लेखी देण्यासाठी येणार होती महिला
तक्रार देण्याकरीता महिला येणार असल्याच्या संदर्भात विचारणा करण्यासाठी महिला पोलिस कर्मचारी महिलेच्या घरी गेल्या, मात्र त्या महिलेने आपण कुठलीही तक्रार देणार नसून याबाबत आपण पोलीस ठाण्यात लेखी देण्यासाठी येणार असल्याचे त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला सांगितल्याची माहिती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी दिली. तसेच हे लेखी देण्यासाठी शनिवारी संध्याकाळपर्यंत येणार असल्याचे महिलेने सांगितले होते, परंतू रात्री पर्यंत ती महिला पोलीस ठाण्यात आलेली नव्हती.