जळगाव : पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील शिंदाड येथील शोभा पाटील या आपल्या नातेवाईकाच्या लग्नातून चाळीसगाव येथून परत येत असताना बसमध्ये चढल्यावर त्यांच्या पर्समधील 7 लाख 80 हजाराचे दागिने हात चलाखीने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
शोभा पाटील या सोमवारी लग्नकार्य आटोपल्यावर आपल्या गावी शिंदाड येथे परत येण्यासाठी चाळीसगाव बस स्थानकातून बसमध्ये बसल्या. बसमध्ये चढताना प्रचंड गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत त्यांच्या पर्समधील त्यांच्यासह सुनेचे 22.5 तोळ्याचे तब्बल 7 लाख 80 हजारचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.
शोभा पाटील बसमध्ये चढल्यावर तीन महिलांनी आमची बस चुकली, असे म्हणत आरडाओरडा केला आणि बसमधून तातडीने खाली उतरले. त्यामुळे याच तीन महिलांनी हे दागिने लंपास केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पुढील तपास पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्थानकाचे कर्मचारी करीत आहे.