जळगाव (प्रतिनिधी) अमृत योजनेंतर्गत सुप्रीम कॉलनी परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या पाण्याच्या अंडरग्राउंड टाकीचे काम अंतीम टप्प्यात आले असून वरील कामकाज सुरू आहे. सुप्रीम कॉलनीवासियांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी लवकरात लवकर मुख्य जलवाहिनी जोडण्याचे काम करावे अशा सूचना महापौर भारतीताई सोनवणे यांनी दिल्या.
सुप्रीम कॉलनीतील पाणी टाकीच्या बांधकामाची मंगळवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी पाहणी केली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे, गटनेते भगत बालाणी, गणेश सोनवणे, प्रवीण कोल्हे, प्रभाग समिती सदस्य विठ्ठल पाटील, संदीप बऱ्हाटे, ऍड.संदीप पाटील, मनपा शहर अभियंता अरविंद भोसले, बाबा साळुंखे, शाखा अभियंता विलास पाटील, अमृत योजना मक्तेदार प्रतिनिधी पंकज बऱ्हाटे, शाहिद सैय्यद, चंद्रकांत भापसे, रउफ खान, अजमल शाह आदी उपस्थित होते.
महापौर सौ.भारती सोनवणे यांनी सांगितले की, आजवर नेहमी सुप्रीम कॉलनीवासियांना पाण्यापासून वंचीत राहावे लागले आहे. विशेषतः उन्हाळ्यात नागरिकांचे मोठे हाल होत होतात. अमृत योजनेंतर्गत सुप्रीम कॉलनीत पाण्याची स्वतंत्र टाकी उभारण्यात येत असून त्याचे काम अंतीम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसात काम पूर्ण करून नागरिकांना लवकरात लवकर नळजोडण्या द्याव्या अशा सूचना महापौरांनी केल्या. तसेच महामार्गाजवळ असलेल्या मुख्य वाहिनीपासून पाण्याच्या टाकीपर्यंत जोडणी तात्काळ करावी आणि वर्षअखेर पर्यंत नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा होईल अशी व्यवस्था करावी, अशा सूचना महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दिल्या.
अर्ध्या जळगावात कार्यान्वित होणार अमृतचा पहिला टप्पा
जळगाव शहरात अमृत योजनेचे काम जलद गतीने सुरू आहे. ज्या परिसरात अमृत योजनेचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे ते तात्काळ पूर्ण करावे. सर्व नळ जोडण्या देऊन शहरातील ८ झोनमध्ये अमृत योजनेंतर्गत पाणी पुरवठा कार्यान्वित करावा, अशा सूचना महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दिल्या. अमृत योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी सकाळी मनपात महापौरांनी बैठक घेतली.