नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (UP Assembly elections 2022) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना त्यांच्या मतदारसंघात कडवी झुंज मिळणार आहे. आझाद समाज पक्षाचे चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad) गोरखपूरमधून निवडणूक लढणार आहेत.
गोरखपूर मतदारसंघातून ते योगी आदित्यनाथ यांचा सामना करतील.चंद्रशेखर आझाद यांच्या पार्टीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. समाजवादी पार्टीसोबत युतीची चर्चा अपयशी ठरल्यानंतर पक्षाने हा निर्णय घेतला आहे. आझाद समाज पार्टीचे सुप्रीमो चंद्रशेखर आझाद म्हणाले की, ते गोरखपूर येथून योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात निवडणूक लढतील. चंद्रशेखर आझाद गेल्या काही दिवसांपासून समजावादी पक्षासोबत तडजोड करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांनी मागितल्या तेवढ्या जागा देण्यास समाजवादी पार्टी नकार देत आहे. त्यामुळे आता समाजवादी पार्टीने १०० जागा दिल्या तरीही त्यांच्यासोबत युती करणार नाही, अशी भूमिका आझाद समाज पार्टीने घेतली आहे.
कोण आहेत चंद्रशेखर आझाद?
घडकोली या छुटमलपूर जवळील गावातील मूळ रहिवासी असलेले चंद्रशेखर आझाद यांनी देहरादून येथून एलएलबीचे शिक्षण घेतले आहे. २०१५ मध्ये त्यांनी भीम आर्मी भारत एकता मिशनची स्थापना केली होती. तेच या संघटनेचे संस्थापक आहेत. मे २०१७ मध्ये शब्बीरपूर गावात झालेल्या जातीय दंगलींविरोधात भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली होती. त्याच वेळी भीम आर्मी चर्चेत आली. तुरुंगातून सुटल्यानंतर चंद्रशेखर आझाद यांनी आपले मिशन सुरुच ठेवले. दलितांविरोधातील प्रकरणात कारवाई करण्याची मागणी करत ते समाजकारणात सक्रीय राहिले. हथरस प्रकरणातील निर्घृणतेपासून राजस्थान आणि हरियाणात झालेल्या घटनांविरोधातही त्यांनी निदर्शने केली. भीम आर्मीने दलित समुदायाच्या शिक्षणासाठी भादो गावात पहिली शाळा सुरु केली होती. इतर शाळांमध्ये पुस्तकांचे वाटप करण्यात आले. साधारण वर्षभरापूर्वी चंद्रशेखर आझाद यांनी आझाद समाज पार्टीची स्थापना केली. त्यानंतर उत्तर प्रदेशातील विविध जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांदरम्यान बुलंद शहरात त्यांनी उमेदवार उभा केला होता. तीन स्तरीय पंचायत निवडणुकांनंतर ते आता विधानसभा निवडणुकीत उमेदवार उतरण्याच्या तयारीत आहेत.