ठाणे (वृत्तसंस्था) आज महाराष्ट्रानं पाहिलं आहे, प्रशासन किती हतबल झालं आहे. असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. ज्यांना सत्तेचा माज आलाय त्यांनी शिवसेनेची शाखा पाडलीय. नेमळटांनो एवढच सांगतोय, आज तुम्ही आमची पोस्टर फाडली, निवडणूका आल्यावर आम्ही तुमची मस्ती फाडणार, असं आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं. मुंब्रा इथल्या शिवसेना शाखेच्या दाव्यावरुन ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने आले आहेत.
उद्धव ठाकरे मुंब्रा इथल्या शिवसेना शाखेच्या पाहणीसाठी गेल्यानंतर प्रचंड राडा झाला. पोलिसांनी रोखल्याने ते माघारी परतले. त्यानंतर त्यांनी जवळच असलेल्या स्टेजवरुन उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, तुम्ही मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारले आहेत. आता मधमाशा कुठे डसतील बघा. शाखेची कागदपत्र आमच्याकडे आहेत. गद्दारांचं डिपॉजिट जप्त करुन त्यांना घरी पाठवा.
पोलिसांचं धन्यवाद मानतो. कारण, त्यांनी शाखाचोरांचं रक्षण केलं. प्रशासन हतबल झाल्याचं संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. आज येथे काही घडलं असतं, तर महाराष्ट्राची अब्रू गेली असती. सत्तेची गादी भोगणाऱ्यांनी आधीच महाराष्ट्राची अब्रू घालवली असल्याचेही ठाकरे म्हणाले. हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला करा आणि या, असं आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं.
मुंब्रा या ठिकाणी जर अनुचित घडलं असतं तर महाराष्ट्राची अब्रू गेली असती. केसाला जरी धक्का लागला असता तर महाराष्ट्राने यांचे केस उपटून टाकले असते, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. उद्यापासून प्रत्येक शाखेत शिवसैनिक जमतील. नेभळटांनो, हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला करा आणि या. मर्दाची अवलाद असेल तर या आणि भिडा, आमची तयारी आहे, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं.