जळगाव (प्रतिनिधी) केंद्र सरकार यावर्षी ‘आजादी का अमृत महोत्सव’ वर्ष साजरे करीत असून त्याअंतर्गत सदृढ आणि सक्षम भारत निर्माण करण्यासाठी नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे जिल्हा प्रशासनाच्या सौजन्याने आज आयोजित केलेल्या ‘फिट इंडिया फ्रीडम रन’मध्ये जळगावकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदविला.
केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे ‘आजादी का अमृत महोत्सव’च्या निमित्ताने फिट इंडिया फ्रीडम रन २.० चे आयोजन करण्यात आले होते. रॅलीची सुरूवात पोलीस कवायत मैदान येथून करण्यात आली. पोवाडा सादरीकरणनंतर दौड सुरू झाली. प्रसंगी खा.उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, राष्ट्रीय सेवा योजनेचे नोडल अधिकारी दिनेश पाटील, गनी मेमन, विनोद बियाणी, नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर आदी उपस्थित होते.
दौडच्या उदघाटनप्रसंगी खा.उन्मेष पाटील म्हणाले की, युवा पिढीचे तन, मन सदृढ राहण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया उपक्रम हाती घेतला आहे. युवक देशाचा आधारस्तंभ असून उद्याचा सदृढ भारत निर्माण व्हावा यासाठी आज तरुणांनी शरीर स्वास्थाचे महत्व ओळखावे. देशभरातील साडेसात कोटी युवा आज या अभियानात सहभागी झाले आहेत. केवळ मनगटात जोर असून चालणार नाही तर मस्तकात देखील जोर असणे आवश्यक आहे. तन, मन सदृढ ठेवण्यासाठी ‘फिट इंडिया फ्रीडम रन’मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन खा.पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी, शरीर सदृढ राखण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरुण पिढीत जर आरोग्य सदृढतेची जागरूकता झाल्यास देशाची संविधानिक मूल्ये जपण्यास देखील मदत होईल, असे प्रतिपादन केले. जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी प्रस्तावना करताना नेहरू युवा केंद्राची माहिती दिली. तसेच आजादी का अमृत महोत्सव साजरा करताना फिट फॉर फ्रीडमचे महत्व विषद केले.
पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे म्हणाले की, भारतीयांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढावी. प्रत्येकाने स्वस्थ आणि तंदरुस्त राहण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. स्वतःसाठी, देशासाठी फिट राहण्यासाठी धावत जावे असे त्यांनी सांगितले. मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांनी सांगितले की, देश केवळ स्वतंत्र असून चालणार नाही तर देश सर्व व्याधींपासून देखील स्वतंत्र असायला हवा. त्यासाठी देशभर फ्रीडम रनचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येकाने उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
पोलीस कवायत मैदानावर मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून दौडला सुरुवात झाली. शिवतीर्थ मैदान, गोविंदा रिक्षा स्टॉप, नेहरू चौक मार्गे पुन्हा पोलीस कवायत मैदानावर शेवट करण्यात आला. रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी नाट्यकर्मी विनोद ढगे यांच्या पथकाने पोवाडा सादर केला. ‘फिट इंडिया’ची शपथ दिल्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगोदर नोंदणी करून निवडकच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता.
कार्यक्रमासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नेहरू युवा केंद्राचे लेखापाल अजिंक्य गवळी, युवक प्रतिनिधी तेजस पाटील, आकाश धनगर, चेतन वाणी, भूषण लाडवंजारी, दीपक सपकाळे, शाहरुख पिंजारी, रोहन अवचारे आदींसह सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. रॅलीत बेंडाळे महाविद्यालय, एसएनडीटी महिला महाविद्यालय, मू.जे.महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.