भुसावळ (प्रतिनिधी) मोटार सायकलने पाठलाग करुन “चलती क्या खंडाला” असे फिल्मी गाणे म्हणून ४४ वर्षीय विवाहीतेचा विनयभंग करणाऱ्या तरुणाविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इब्राहीम उर्फ टीपू उर्फ टिप्या सत्तार मण्यार (वय २४) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
इब्राहीम उर्फ टिप्या हा आपल्या विना क्रमांकाच्या मोटार सायकलने पिडीत विवाहीतेचा तालुक्यातील एका गावाच्या बस स्थानक परिसरात सतत पाठलाग करत होता. 4 मार्च रोजी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास टिप्याने मोटार सायकल विवाहितेच्या अगदी जवळ नेत “चलती क्या खंडाला” असे म्हणून विनयभंग केला. याशिवाय पिडीत विवाहीतेकडे बघून शिटी मारणे, हाताने इशारे करुन गाणे म्हणणे असे प्रकार नेहमी करत होता. या प्रकाराला वैतागून पिडीत विवाहीतेने भुसावळ तालुका पोलिस स्टेशन गाठत टिप्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल पवार करत असून संशयित आरोपी टिप्याला अटक करण्यात आली आहे.