एरंडोल प्रतिनिधी : तालुक्यातील भातखेडा येथे सासरच्या लोकांकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मयत तरुणाचे नाव गौरव ज्ञानेश्वर बडगुजर असे असून त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सासरच्या लोकांकडून होत असलेल्या मानसिक छळाचा उल्लेख केल्याचे समोर आले आहे. या सुसाइड नोटमध्ये सासू, साली तसेच साडू यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी कासोदा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये सासू अनिता बडगुजर, साडू भटू गरुड आणि साली गौरी गरुड यांचा समावेश आहे.
माहितीनुसार, सासरच्या लोकांकडून सतत पैशांची मागणी आणि धमक्या दिल्या जात असल्यामुळे गौरव बडगुजर मानसिक तणावाखाली होते. याच मानसिक छळाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाइड नोट जप्त केली असून या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.















