सांगली (वृत्तसंस्था) सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने दरवर्षी क्रिकेट स्पर्धा भरवल्या जातात. पण यावेळी सांगलीच्या आटपाडीमध्ये क्रिकेट स्पर्धेदरम्यान खेळत असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अतुल विष्णू पाटील (वय ३५) असं मयत तरुणांचे नाव आहे.
सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने दरवर्षी क्रिकेट स्पर्धा भरवल्या जातात. यावर्षी त्या आटपाडी येथे सुरू होत्या. तासगाव तालुका संघातून विकेट किपर म्हणून अतुल पाटील खेळत होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास सामना सुरू असताना त्यांनी एक बॉल अडवला असता अचानक ते मैदानावरच कोसळले. अतुल पाटील मैदानावर कोसळल्यामुळे इतर खेळाडूंनी त्यांच्याकडे धाव घेतली. त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. अचानक घडलेल्या या प्रकाराने सारे अक्षरशः हादरले होते. त्यांच्या अकाली निधनामुळे ढवळी गावावर शोककळा पसरली आहे. रात्री उशीरा ढवळी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.