नागपूर (वृत्तसंस्था) कळमेश्वरातील एका २६ वर्षीय तरुणाचा डेंग्यूमुळे नागपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. निखिल शशिकांत उतखेडे, (२६, रा. पीडब्ल्यूएस कॉलेजसमोर, गिरडकर ले-आउट, कळमेश्वर), असे मृतक तरुणाचे नाव आहे. एकुलता एक मुलगा गमावल्याने आई-वडिलांनी काळीज चिरणारा आक्रोश केला.
निखील राहत असलेल्या कॉलनीसमोर झाडाझुडपांसह गवत व सांडपाण्याची गटारे आहेत. यामुळेच निखिलला डेंग्यू झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. निखिल मागील काही दिवसांपासून आजारी होता. त्याला रविवारी (२४ सप्टेंबर) नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीअंती त्याला डेंग्यू आजार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याला अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. एकुलता एक मुलाचा मृतदेह बघताच कुटुंबीयांनी काळजी चिरणारा आक्रोश केला.