जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कानळदा येथील तरुणाकडून गावठी पिस्तुलासह २ जिवंत काडतूस जप्त करत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारोळा तालुक्यातील देवगाव येथून सोमवारी १६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता अटक केली आहे. सुहास भरत बाविस्कर (वय-३८, रा. कानळदा ता. पाचोरा), असे संशयित आरोपीचे नाव आहे.
जळगाव तालुक्यातील कानळदा येथील सुहास बाविस्कर हा तरुण पारोळा तालुक्यातील देवगाव येथे हातात गावठी पिस्तूल घेऊन परिसरात दहशत माजविण्याच्या इराद्याने फिरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
पथकातील पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, अनिल जाधव, हवालदार दीपक माळी, रविंद्र पाटील, विलेश सोनवणे, हेमंत पाटील, प्रदिप चवरे यांनी कारवाई करत सोमवारी १६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता संशयित आरोपी सुहास भरत बाविस्कर याला पारोळा तालुक्यातील देवगाव येथून अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस जप्त केले आहे. पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याची वैद्यकिय तपासणी करून सदर गुन्ह्याचे पुढील तपासकामी पारोळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.