धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शामखेडे येथील योगेश पांडुरंग सातपुते यास विनयभंग प्रकरणी आज धरणगाव न्यायालयाने 3 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शामखेडे येथील योगेश पांडुरंग सातपुते याने गावातीलच महिलेचा विनयभंग करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी 5 जानेवारी 2022 रोजी धरणगाव पोलिसात भा.द.वि कलम 354,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
असे आहे शिक्षा आणि दंडाचे स्वरूप !
धरणगाव न्यायालयात या खटल्यात फिर्यादीसह एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले. तर आरोपी योगेश पांडुरंग सातपुते यास कलम 354 प्रमाणे 3 वर्ष शिक्षा व दहा हजार दंड तर कलम 506 प्रमाणे 2 वर्ष शिक्षा व दहा हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिन्याची साधी कैदेची शिक्षा,असे आदेश धरणगाव येथील न्यायमूर्ती एस.डी.सावरकर यांनी दिले आहेत.
सदर खटल्यात सरकारी वकील म्हणून अँड. हटकर मॅडम व सदर कामी फिर्यादी महिलेतर्फे अँड रिषभ.एस.शुक्ला यांनी कामकाज पाहिले. विशेष म्हणजे सदरील खटल्यात आरोपी हा गुन्हा घडल्यापासून कारागृहातच आहे.
पोलिसांचा तपास ठरला महत्त्वपूर्ण
पीडित महिला पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला आल्यानंतर पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ गुन्हा दाखल केला. त्यानंतर तपासी अंमलदार यांना योग्य ते मार्गदर्शन केले. पोलिसांनी या प्रकरणात शास्त्रोक्त पद्धतीने तपास करत महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केले. एवढेच नव्हे तर अवघ्या काही दिवसात न्यायालयात दोषारोप पत्र देखील सादर केले. तसेच आरोपीवरील इतर गुन्ह्यांची माहिती सुद्धा न्यायालयात दिली. त्यामुळे न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून आज शिक्षा सुनावली.
पीडित महिला पोलीस स्थानकात आल्यानंतर आम्ही संपूर्ण परिस्थिती समजून घेतली. पोलिसांनी योग्य तो तपास करत पुरावे गोळा करुन न्यायालयात तात्काळ दोषारोपपत्र सादर केले. पीडित महिलेला न्याय मिळवून देऊ शकलो याचा आनंद आहे.
– पोलीस निरीक्षक शंकर शेळके