जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सागरपार्क मैदानाजवळून आई-वडीलांसह शतपावली करत जाणाऱ्या तरुणाचा दोन अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरुन येवून मोबाईल धुमस्टाईल लांबविल्याची घटना शुक्रवारी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील सागरपार्क मैदानाजवळ बॅरिस्टर निकम चौकाकडून रामदास कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आई-वडीलांसह शतपावली करत असतांना शुभम दिलीप भिरुड (वय २४ रा शिवराम नगर) या तरुणाचा १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल दुचाकीवरुन आलेल्या दोघ चोरट्यांनी चोरून नेला. शुभम भिरुड हा गुजरात राज्यातील सुरत येथे एम-टेक चे शिक्षण घेत आहे. सध्या तो घरीत आहे. शुक्रवारी रात्री जेवणानंतर शुभम हा त्याचे वडील दिलीप श्रावण भिरुड व आई निता, भाऊ रुपेश या कुटुंबियासमवेत बॅरिस्टर निकम चौक ते रामदास कॉलनी रस्त्यावर शतपावली करीत होता. बॅरिस्टर निकम चौकात चालत असतांना, शुभमला त्याचा मावस भाऊ हर्षद याचा फोन आला. त्याच्याशी मोबाईलवर बोलत असतांना अचानक दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी कानाला लावलेला मोबाईल हिसकावून नेला व रामदास कॉलनीकडे दोघे पसार झाले. शुभमसह त्याच्या भावाने दोघांचा पाठलाग केला मात्र त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. याप्रकरणी शुभम भिरुड याने तत्काळ रामानंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी करीत आहेत.