जळगाव प्रतिनिधी । शासनाच्या आदेशानुसार जिल्हा कारागृहात स्वतंत्र केविड केअर सेंटर व स्वतंत्र संस्थात्मक अलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला आहे. कारागृहात सर्व 400 बंद्यांची महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कोरोना चाचणी करण्यात आली. यात 18 बंदी हे कोरोना बाधित आढळून आलेले असून उर्वरीत सर्व कैदी निगेटीव्ह असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे.
कोविड-19 विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील कारागृहामध्ये नव्याने दाखल होणा-या बंद्याकरिता तात्पुरती अलगीकरणाची सुविधा करुन देणेकरिता तात्पुरते कारागृह तयार करणेबाबत शासनस्तरावरुन निर्देश देण्यात आले होते. या निर्देशाचे अनुषंगाने जळगाव जिल्हा कारागृह येथे स्वतंत्र केविड केअर सेंटर व स्वतंत्र संस्थात्मक अलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला आहे. यात ठिकाणी सर्व बंद्यांची तपसणी करण्यासाठी एक डॉक्टर व दोन नर्सिग स्टाफ यांची पूर्ण वेळ नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्यामार्फत सर्व बंद्यांची नियमितपणे तपासणी केली जात आहे. कोरोना बाधित आढळून आलेल्या 18 बंद्यांपैकी 5 बंद्यांची न्यायालयाव्दारे जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. त्यांना जळगाव शहरातील केविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आलेले आहे. सद्य:स्थितीत जळगाव जिल्हा कारागृहामध्ये 13 कोरोना बाधित बंदी दाखल असून त्यांची व्यवस्था कारागृहामधील स्वतंत्र कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आली आहे व त्यांचेवर नियमितपणे उपचार व देखभाल वैद्यकीय पथकामार्फत सुरु आहे. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.