जळगाव (प्रतिनिधी) धनुष्यबाण कोणाचा हे राष्ट्रवादी नव्हे, तर निवडणूक आयोग ठरवणार आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसला माजीमंत्री गुलाबराव पाटील यांनी सुनावले आहे. ते जळगावात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
राजीनामा देवून निवडून या, असे आव्हान आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना केले होते. याला उत्तर देतांना गुलाबराव पाटील म्हणाले, आम्ही राजीनामा देण्याचा प्रश्नच कुठे येतो, आम्ही पक्ष सोडलेला नाही, शिवसेनेचे आमदार म्हणूनच आम्ही काम करतो आहोत. शिवसेना आणि धनुष्यबाण वाचवा यासाठीच आम्ही उठाव केला होता,असेही श्री. पाटील यांनी स्पष्ट केले. गेली अडीच तीन वर्ष आम्ही तेच सांगत होतो, उद्धव ठाकरे आजारी होते, पण आदित्य ठाकरे तरूण होते, त्यांनी तरी बाहेर फिरायला पाहिजे होते. आता जसे ते पायाला भिंगरी लावून दौरे करत आहेत, तसे आधी करायला हवे होते, आमची हीच तर मागणी होती, असेही पाटील म्हणाले.