जळगाव दूध संघाची निवडणूक जाहीर होण्याआधी पासून आमदार मंगेश चव्हाण यांनी दूध संघात मोठा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत आवाज उठविला होता. तेव्हापासून माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे आणि आमदार चव्हाण यांच्यात जोरात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. सुरुवातीला सर्वपक्षीय पॅनलची भूमिका दोन्ही गटांकडून समोर आली होती. परंतु आमदार चव्हाण यांनी खडसे वगळता सर्वपक्षीय पॅनलची भूमिका पहिल्या दिवसापासून कायम ठेवली.
भाजप शिंदे गट आणि महाविकास आघाडी यांनी बैठका मिळावे सुरू केल्यामुळे सर्वपक्षीय पॅनलची शक्यता धूसर झाली होती. परंतु आज सकाळपासून दोन दिग्गज नेते सर्वपक्षीय पॅनलसाठी जोरदार फील्डिंग लावत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
याबाबत आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मला बातम्यांच्या माध्यमातूनच सर्वपक्षीय पॅनल संदर्भात पुन्हा एकदा प्रयत्न सुरू असल्याचे कळाले.परंतू आपण खडसेंविरुद्ध निवडणूक लढणारच असून कुणी सर्वपक्षीय पॅनल बनवत असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. परंतु मी निवडणूक लढवून दूध संघासाठी जनतेतून कौल मागण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे.
दरम्यान, मंगेश चव्हाण हे निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे सर्वपक्षीय पॅनल बनणार की नाही?, याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.भाजपातील काहीजण देखील निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे कळते.
















