भुसावळ (प्रतिनिधी ) । येथील श्रीमती प. क, कोटेचा महिला महाविद्यालयात भूगोल विभाग आणि इतिहास विभागातर्फे भूगोल दिन व मकर संक्रांत उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतिहास विभाग प्रमुख प्रा. दिपाली पाटील होत्या.
भूगोल दिवस व मकर संक्रांत कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. गिरीश सरोदे यांनी आपल्या व्याख्यानातून मानवी जीवन व भूगोलाचे नाते अतूट व वैविध्यपूर्ण असल्याचे स्पष्ट केले. तसेच भूगोल हा केवळ शालेय,महाविद्यालयीन शिक्षणाचा भाग नसून तो मानवी जीवनाचा भाग आहे. १४ जानेवारी या दिवशी ऋतू परिवर्तनाचा प्रत्यक्ष अनुभव आपणास घेता येतो. या दिवशी मकर संक्रांत साजरी करतात. संक्रांत म्हणजे संक्रमण. पौष महिन्यात सूर्याचे धनु राशीतून मकर राशीत मार्गक्रमण करण्याची क्रिया म्हणजे संक्रमण. सूर्य मकर राशीत आला की मकर संक्रांत होते. मकर संक्रांत या दिवसानंतर सूर्य विषुववृत्ताच्या उत्तरेकडे सरकू लागतो, ऋतू परिवर्तन घडून येते. दिवस तीळ तीळ मोठा होत जातो. संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव मानला जातो, संक्रांतीचे दिवस थंडीचे असतात. याच दिवशी उष्णता देण्याचा, औष्णिकता, मधुर आणि पौष्टिकता या सिग्धतेचे गुण तीळ व गुड या पदार्थांमध्ये आढळतात. म्हणून या दिवशी तिळाचे व गुळाचे महत्त्व मानले गेले आहे. एकमेकांची स्नेह वाढवण्यासाठी गोडी वाढवण्यासाठी आपण म्हणतो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. त्याचप्रमाणे या दिवशी पतंग उडवण्याची प्रथा सुद्धा प्रचलित आहे अखंड असा पतंगाचा धागा पतंगाला एकात्मतेने जखडून ठेवतो. अशाच प्रकारे तिळाचा स्नेह एकमेकांना स्नेहाच्या बंधनात जोडून ठेवतो. या पर्वाच्या निमित्ताने सूर्याचा प्रकाश, तिळाचा स्नेह, गुळाचा गोडवा, पतंगाच्या सूत्रधागेवरचा अतूट विश्वास आपल्या जीवनामध्ये साकार झाला पाहिजे तरच आपल्या जीवनामध्ये योग्य संक्रमण झाले असे म्हणता येईल. कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रा.सौ. दिपाली पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात या दिनाचे ऐतिहासिक महत्त्व सांगितले. आपण कोणताही सण धार्मिकतेच्या दृष्टिकोनातून पाहायला हवे असे नव्हे तर विज्ञानवादी दृष्टिकोनातून सुद्धा त्यांच्याकडे पाहायला हवेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एफ वाय बी ए ची विद्यार्थिनी सृष्टी चौधरी हिने केले. आभार एफ वाय बी ए ची विद्यार्थिनी खुशी टाक हिने मानले.