चोपडा प्रतिनिधी (वृत्तसंस्था) विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणावर विपरीत परिणाम होत असल्यामुळे ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ कार्यक्रमातून शिक्षकांना वगळण्यात यावे, अशी मागणी चोपडा माध्यमिक संघाने केली आहे.
आजारासंबंधी कामकाजासाठी सेवा अधिग्रहीत केलेल्या शिक्षकांना शासनाचे कार्यमुक्तीचे आदेश असल्यानंतरही प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व आश्रमशाळांमधील शिक्षकांना ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत दररोज ५० कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यात विविध प्रकारच्या २२ मुदयांची माहिती भरावी लागते. या कामकाजात शिक्षकांचा संपूर्ण दिवस जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या सर्वेक्षण मोहिमेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि ११ सप्टेंबर २०२० च्या परिपत्रकात शिक्षकांना सदरील शिक्षणाची जबाबदारी देण्याबाबत स्पष्ट उल्लेख नसतानाही नाहक शिक्षकांना सदर कामात अडकविले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. संघटने मार्फत चोपडा नगरपालिकाचे मुख्याधिकारी अविनाश गांगोड़े , पंचायत समितिचे गटविकास अधिकारी भरत कोसोदे , गटशिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले यांना निवेदन देण्यात आले.त्यावेळी चोपडा तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष मंगेश भोईटे , उपाध्यक्ष , सचिव , सहसचिव , शिक्षक भारती संघटनाचे पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.