जळगाव (प्रतिनिधी) फेसबुकवर विविध चॅलेंजचे ट्रेंडच्या माध्यमातून टाकलेल्या फोटोंचा गैरवापर होऊ शकतो, असे सांगत जळगाव पोलिसांनी नागरिकांना सावध केले आहे. मात्र, दुसरीकडे ‘जळगाव फिमेल एस्कॉर्ट’च्या नावाखाली तरुणाईला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून पैसे उकळण्यासाठी इंटरनेटच्या दुनियेत गुलाबी जाळे तयार करण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याबाबत ‘द क्लिअर न्यूज’ने ‘रियलटी चेक’ केल्यानंतर अक्षरशः चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे.
सध्या फेसबुकवर विविध चॅलेंजचे ट्रेंड सुरु आहेत. त्यात प्रामुख्याने #coplechallenge, #familychallenge, #singlechallenge, #doughterchallenge यांचा समावेश आहे. परंतू याबाबत जळगाव पोलिसांनी फेसबुकद्वारे सावधगिरीचा इशारा दिला असून, तुम्ही पोस्ट केलेल्या फोटोचा गैरवापर होऊ शकतो, त्यातून आपल्याला मानसिक,शारीरिक किंवा आर्थिक नुकसान होऊ शकतो. अशा चॅलेंजमुळे आपल्या फोटोंचा गैरवापर होऊ शकतो. सायबर गुन्हेगारांना अशा चॅलेंजमुळे आपल्या परिवारातील फोटो सहज मिळू शकतात. सायबर गुन्हेगार अशा प्रकारचे फोटो मिळवून गैर वापर करू शकतात. त्यामुळे अशा ट्रेंडमध्ये आपले फोटो टाकण्याअगोदर विचार करावे, असे आवाहन जळगाव पोलिसांनी केले आहे.
दुसरीकडे मात्र, वेबसाईटच्या माध्यमातून देखील जळगावच्या तरुणाईला जाळ्यात ओढण्याचे प्रकार समोर आला आहे. याच अनुषंगाने ‘जळगाव फिमेल एस्कॉर्ट’ हा शब्द गुगलवर सर्च केल्यावर काही वेबसाईट समोर आल्या. जळगाव महाराष्ट्र फिमेल एस्कॉर्ट एवढेच गुगल सर्च केल्याबरोबर काही साईट्स इंटरनेटवर समोर येतात. पुरावा म्हणून एक लिंक देत आहोत.
https://sihi.biz/maharashtra/jalgaon-escorts-girls.html. या वेबसाईटवर तर जळगाव जिल्ह्याची इथंभूत माहिती आहे. त्यात अगदी अजिंठा वेरूळ, पद्मालय, मुक्ताईनगर येथील चांगदेव आदी देवस्थानांसह निसर्गरम्य स्थळांबाबत देखील माहिती देण्यात आली आहे. बाहेरून येणाऱ्या ग्राहकांना जळगाव अशा कामांसाठी कसं सुरक्षित आहे, हे देखील पटवून सांगण्यात आले आहे.
याठिकाणी काही भागात माहिती देण्यात आली आहे. त्यात सुंदर आणि स्वत्रंतरित्या राहणाऱ्या कॉलगर्ल, सर्व प्रकारच्या मॉडेल डेटिंग आणि मिटिंग सर्विस, रिअल व्हाट्सअप नंबर, फोटोज आणि रेट, अशा टप्प्यात माहिती आहे. तसेच मोबाईल नंबर (९५७४६७१***) देखील देण्यात आला आहे. या नंबरवर आमच्या प्रतिनिधीने फोन लावला असता, एका पुरुषाने फोन उचलला.
भाई आपका नंबर वेबसाईट पे था…
मैं जलगाव महाराष्ट्र सें बात कर रहा हुं…
एवढे बोलल्यावर तो थेट म्हणाला आप व्हाटसअप करो….
व्हाटसअपवर फक्त हाय असा, मॅसेज टाकल्याबरोबर तिकडून लोकेशन आणि सिटी नेम, असं विचारण्यात आले. सिटी नेम टाकल्याबरोबर तिकडून तासा निहाय काय रक्कम लागेल याची माहिती टाकण्यात आली. त्यात ३ हजार पासून तर थेट १२ हजारपर्यंतचे रेट होते. हा मॅसेज पाठविल्याच्या थोड्याच वेळात सहा वेगवेगळ्या मुलींचे फोटो पाठवण्यात आले. पाठविण्यात आलेल्या मुलींचे फोटो शंभर टक्के जळगावच्या मुलींचे नाहीत. हे फोटो दुसऱ्याच राज्यातील मुलींचे आहेत. त्यानंतर पुढे कसं करायचं विचारल्यानंतर त्याने बुकिंगसाठी बँक अकाऊंटच्या डीटेल्स पाठवल्या. अगदी गुगल पे नाही का? असं विचारल्यावर त्याने ‘गुगल पे’चा स्कॅनिंग कोड देखील पाठवला. हा सर्व संवाद दोन दिवसात झाला. समोरील व्यक्तीने काही संवाद टेक्स तर काही संवाद ऑडीओ मॅसेजने केला आहे.
एकदा पैसे अकाऊंटला जमा झाल्यावर तुमचा फोन नंबर ब्लॉक केला जातो. अशा पद्धतीने लोकांकडून पैसे मागवून तरुणांना गंडवले जाते. गंडवलेले लोकं सामाजिक भीती पोटी पोलिसात तक्रार द्यायला देखील घाबरतात. त्यामुळे जळगाव पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालत कारवाई करणे गरजेचे आहे. काही वर्षापूर्वी ऑनलाईन देहव्यापारच्या धंद्यासंबंधी माहिती समोर आली होती. परंतु इतक्या वर्षानंतरही या धंद्यात जळगावची सुरु असलेली बदनामी अद्यापही सुरूच आहे. ऑनलाईन देहव्यापारच्या धंद्यात जळगावची होत असलेली बदनामी अद्यापही सुरूच असणे, हे शहराच्या प्रतिमेच्या दृष्टीकोनातून प्रचंड धोकेदायक आहे.
अशा वेबसाईटद्वारे सेक्स स्कँडल्स् वा वैश्याव्यवसाय होत नाही आणि हे सगळे बनावट असल्याचे आपण तूर्त गृहीत धरू. परंतु या वेबसाईटवरून मुलींचे आमिष दाखवून पैसे उकळले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशा पद्धतीने फसवल्या गेल्यासंबंधी साम्य असणाऱ्या घटना जळगाव जिल्ह्यात देखील कधी काळी उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
वास्तविक बघता अशा वेबसाईटची सर्व माहिती मिळविणे सायबर सेलसाठी फार कठीण बाब नाहीय. सबंधित वेबसाईटची होस्टिंग आणि डोमेन नेम कुणाच्या नावावर रजिस्टर आहे किंवा आयपी अॅड्रेसबाबत माहिती मिळविणेही सहज शक्य आहे. सबंधित वेबसाईटच्या मालकापर्यंत पोहोचणे सहज शक्य नसले, तरी गुगलकडे तक्रार नोंदविल्यास सबंधित वेबसाईटवरून विशिष्ट मजकूर किंवा थेट साईट देखील डाऊन करता येऊ शकते. यात धोका असा आहे की, सबंधित वेबसाईटची होस्टिंग परदेशात असल्यास मात्र, गंभीर मर्यादा येतात. परंतु जळगावच्या सायबर सेलने काही दिवस प्रामाणिक प्रयत्न केल्यास यात कारवाई होण्याची शक्यता आशा आहे.
आपल्या जळगावात छोटे-मोठे किंवा काही गंभीर गोष्टी घडल्या आहेत. परंतु सर्व्हिस प्रोव्हायडींगचे डिजिटल फंडे तेही इतक्या आधुनिक पद्धतीने आताच्या काळात सुरु असणे अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब आहे. आता या वेबसाईटमधील गोष्टी खऱ्या की, खोट्या? याचा शोध घेण्याचे काम पोलीस प्रशासनाचे आहे. माहिती खरी असल्यास पाळेमुळे खोदून काढावीत अन्यथा संबंधित वेबसाईट बंद करण्यासाठी किंवा किमान जळगावचा मजकूर काढण्यासाठी तरी प्रामाणिक प्रयत्न अपेक्षित आहेतच. तर दुसरीकडे पालकांना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. अशा मोहक जाळ्यांमध्ये तरुणाई पटकन फसते. दरम्यान, केंद्र सरकारने साडेतीन हजार पॉर्न साईट बंद केल्याचे सांगितले. परंतू अशा पद्धतीच्या वेबसाईट देखील कारवाई अपेक्षित आहे.
महिलांनी सोशल मिडीयावर फोटो टाकतांना सावधगिरी बाळगणे गरजेचे
विकृत गुन्हेगार एका महिलेच्या ठिकाणी दुसऱ्या महिलांचे मार्फ (एडिट) करून ते अश्लील छायाचित्र नातेवाइकांना किंवा मित्र परिवारांना पाठवून संबंधित महिलेचे कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. एवढेच नव्ह तर तिला ब्लॅकमेल केले जाऊ शकते. त्यामुळे वेळीच सावध होणे गरजेचे आहे.