जळगाव (प्रतिनिधी) शहरात अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली असून नागरिकांचे मोठे हाल होत आहे. शहरातील रस्ते तयार करण्यासाठी बुधवारी झालेल्या महासभेत ठराव करण्यात आला असून त्यादृष्टीने महापौर सौ.भारती सोनवणे यांनी लागलीच गुरुवारी दोन्ही मक्तेदारांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. महासभेत झालेल्या ठरावांवर तातडीने सह्या करण्यात आल्या असून कामांची यादी देत अमृत योजना आणि मलनिस्सारण योजनेची कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहे.
जळगाव शहरात गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची कामे करण्यात आलेली नाही. त्यातच दोन वर्षापासून अमृत आणि मलनिस्सारण योजनेचे काम सुरु असल्याने गल्लोगल्ली रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नागरिकांची हाल होत असल्याने बुधवारी घेण्यात आलेल्या महासभेत ४७ कोटींची कामे करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर निधीतून देखील अनेक कामे करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। गुरुवारी महापौर भारती सोनवणे यांनी तात्काळ ठरावांवर सह्या केल्या.
मक्तेदार, अधिकाऱ्यांची घेतली बैठक
गुरुवारी सकाळी महापौरांनी आपल्या दालनात अमृत आणि मलनिस्सारण योजनेच्या मक्तेदार प्रतिनिधी व मनपानगरविकास अधिकारी सुनील गोराणे, शहर अभियंता डी.एस.खडके, योगेश बोरोले यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी, विष्णू भंगाळे, किशोर बाविस्कर, भारत कोळी आदी उपस्थित होते. महासभेत झालेल्या ठरावाची आणि निश्चित करण्यात आलेल्या कामांची यादी महापौरांनी दोन्ही मक्तेदारांना दिली. तसेच मंजूर रस्त्यांच्या प्रभागातील कामे तातडीने पूर्ण करून देण्याचे पत्र महापौर सौ.भारती सोनवणे यांनी त्यांना दिले.
रामदास कॉलनीत साकारणार नाना-नानी पार्क
रामदास कॉलनीत असलेल्या मोकळ्या जागेवर २ कोटी रुपये खर्चून भव्य नाना-नानी पार्क साकारण्यात येणार आहे. मनपा महासभेत या कामाला मंजुरी देण्यात आली असून लवकरात लवकर कामाला देखील सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दिली आहे. कामाचा एक अंदाजित ले आउट देखील तयार करण्यात आलेला आहे. रामदास कॉलनीत नाना-नानी पार्क तयार झाल्यास नागरिकांसाठी फिरायला हक्काची जागा उपलब्ध होईल.
या परिसरातील रस्ते होणार पहिल्या टप्प्यात
शहरातील रस्त्यांची कामे दोन टप्प्यात केली जाणार आहेत. त्यापैकी बुधवारी मंजूर झालेल्या महासभेत दूध फेडरेशन, खडकेचाळ, सब स्टेशन ते सिटी कॉलनी, कानळदा रोड, लाकुडपेठ, असोदा रोड, दधिची चौक ते नेरी नाका, भिलपुरा चौकी ते ममुराबाद रेल्वे पूल, सूर्या सॉ मील, गोविंदा रिक्षा स्टॉप ते पिंप्राळा रेल्वे गेट, नानीबाई हॉस्पिटल, देविदास कॉलनी, टी.एम.नगर, पंचमुखी हनुमान मंदिर, कोर्ट चौक ते गणेश कॉलनी, आयटीआयच्या पूर्वेकडील बाजू, आशाबाबा मंदिर, पिंप्राळा परिसर, नवसाचा गणपती मंदिर रस्ता, एसएमआयटी रस्ता, प्रभाग ९, खोटे नगर, गुड्डूराजा नगर, निमखेडी रोड, द्वारका नगर, प्रभाग ८, मेहरूण परिसर, गिरणा टाकी, रामदास कॉलनी, ओंकारेश्वर मंदिर, रामानंद नगर घाट ते कोल्हे नगर, अल्पबचत निवासी क्वार्टर ते जीएसटी भवन, पिंप्राळा मेहरूण शिवरोड, समता नगर, अनुराग स्टेट बँक कॉलनी, महाबळ, झाकीर हुसेन कॉलनी, मोहाडी रोड, देवेंद्र नगर, गणपती नगर, डी मार्ट, शिवाजी उद्यान, अशोक किराणा, जकात सोसायटी, तुळजा माता नगर, बौद्ध विहार ते कानळदा रस्त्यापर्यंतचा रिंगरोड, के.सी.पार्क, क्रांती चौक, शिवाजी नगर हुडको, सुपारी कारखाना, धनाजी काळे नगर, आव्हाणे रोड, बाबा हरदासराम मंगल कार्यालय, आंबेडकर नगर, बीएसएनएल क्वार्टर, रिंगरोड, चांद्रप्रभात कॉलनी, प्रभुदेसाई कॉलनी, कोल्हे नगर ते गिरणा पंपींग रिंगरोड, रुख्मा टेंट हाऊस, पांझरापोळ चौक, अयोध्या नगर, वाघ नगर, खंडेराव नगर, हुडको, एकलव्य जिम ते शिवकॉलनी, गृहकुल कॉलनी, पंढरपूर नगर, शनीपेठ पोलीस स्टेशन ते ओक मंगल कार्यालय, कालंका माता मंदिर ते रेल्वे लाईन, दिनकर नगर, तानाजी मालुसरे नगर, सुनंदिनी पार्क, काशीनाथ नगर, नवीपेठ, रथचौक, आय.एम.आर, आरएमएस कॉलनी, तांबापुर, शिरसोली नाका, हरीओम नगर, लिलापार्क, दत्त कॉलनी, वाघ नगर, जुना खेडी रोड, खेडी ते राष्ट्रीय महामार्ग, गोपाळपुरा, सिंधी कॉलनी चौक, महाबळ, घाणेकर चौक ते शिरसोली रोड, बॉम्बे लॉज ते अजिंठा चौफुली, नेरी नाका ते स्वातंत्र्य चौक, एस.टी.वर्कशॉप ते का.ऊ. कोल्हे विद्यालय, वाघ नगर ते डी.मार्ट, भैरव नगर, मयूर कॉलनी, जि.प.कॉलनी, गौतम नगर, आनंदवन हौसिंग सोसायटी असे प्रमुख रस्ते पहिल्या टप्प्यात होणार आहेत. उर्वरित रस्ते दुसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहेत.