बोदवड (प्रतिनिधी) येथील भारतीय स्टेट बैंकेच्या शाखेत अमर डेअरीच्या रकमेच्या भरणा करण्यास आलेल्या व्यक्तीची नजर चुकवून एका तरुणाने तब्बल ८ लाख ४० हजाराची रक्कम लंपास केल्याची घटना आज सकाळी घडली आहे. दरम्यान, संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली असून परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास अमर डेअरी या खाजगी डेअरीच्या रकमेचा भरणा करण्यास उमेश महाजन हे आले होते. महाजन हे काऊंटरवर भरणा स्लिप भरत असतांना बाजूच्या खुर्चीवर ठेवलेली रोख रकमेची थैली मागे पाळत ठेवून उभा असलेल्या एका वर्षीय तरुणाने लंपास केली. कोणाच्याही लक्षात येण्याच्या आधी हा प्रकार घडला. बैंकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सदर प्रकार कैद झाला आहे. निळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या चोरट्याने तोंडावर मास्क लावलेला होता. या प्रकरणी उमेश महाजन यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे हे करीत आहेत.