बोदवड(प्रतिनिधी) बोदवड नगरपंचायत प्रभाग दोनचे राष्ट्रवादीचे नगरसेवक कडूसिंग पाटील उर्फ भरत आप्पा पाटील यांनी अतिक्रमण करून बांधकाम केल्याची आपण तक्रार केली होती, ही तक्रार झाल्याचे समजताच त्यांनी अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी घरापुढील कंपाऊंड वॉल जेसीबीने तोडून पुरावा नष्ट केल्याचा आरोप तक्रारदार राजेश अग्रवाल यांनी केला आहे.
या प्रकरणी तक्रारदार अग्रवाल यांनी दिलेली माहिती अशी की, जिल्हाधिकारी यांच्याकडे २ जुलै २२ रोजी साध्या पत्राद्वारे तक्रार केली होती की, नगरसेवक पाटील यांचा गट क्र.१७०/६ या सामाईक भूखंडापैकी १.१८.७२ म्हणजेच १२७७ फूट भूखंड आहे. मात्र, त्यांनी नागरपंचायतच्या खुल्या भूखंडावर तसेच रस्त्यावर अतिक्रमण करून ६०×५० म्हणजेच जवळपास ३००० स्क्वेअर फूट बांधकाम केले असून त्यांनी वॉल कंपाऊंड बांधले आहे. तसेच सदर प्लॉटच्या बाजूच्या ओपन प्लेस मधून उच्च दाबाची वीज वाहिनी गेली आहे. त्यात बांधकाम करतांना कामगार जखमी झाला होता. त्या वाहिनी खालील खुला भूखंड हडपला आहे. एवढेच नाही तर या नगरसेवकाने महात्मा फुले चौकात सुद्धा शासनाचे जागेवर अतिक्रमण करून भव्य दुकान बांधले असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
हा प्रकार लोकप्रतिनिधी साठी असलेल्या नियम व कायद्याच्या विरुद्ध आहे. म्हणून त्यांना अपात्र घोषित करावे. तसेच याच व्यक्तीने मागे एका प्राध्यापकाची फसवणूक केल्याची बातमी तथा ग्राहक न्यायालयाने दंड सुनावल्याचे प्रसिद्ध झाली आली आहे. अश्या आशयाच्या तक्रारी ७ सप्टेंबर २२ आणि २ नोव्हेंबर २२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात स्मरण पत्र दिले होते. तसेच २ नोव्हेंबर २२ रोजी मुख्याधिकारी बोदवड नगरपंचायत यांना सुद्धा दिली होती. मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने पुढील चौकशीआधी संबंधित नगरसेवकाने पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने कंपाऊंड वॉल तोडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
याबाबत पुन्हा आज १० रोजी नागरपंचायतच्या कार्यालयात तक्रारदार अग्रवाल यांनी पुन्हा एक तक्रार दिली असून त्यात जर योग्य चौकशी होऊन अपात्रतेची कारवाई न झाल्यास नगरपंचायत समोर उपोषण किंवा आत्मदहन करू असाही इशारा त्यांनी या अर्जात दिला आहे. याबाबत नगरसेवक पाटील यांनी प्रतिक्रिया दिली की, मी कोणतेही अतिक्रमण केले नसून मला अद्याप नगरपंचायत कडून कोणतीही नोटीस आलेली नाही. सदरच्या खुल्या भूखंडावर प्रभागातील नागरिकांच्या मागणी नुसार स्वच्छता करून झाडे लावत आहे. त्यामुळे काहींचा गैरसमज झाला असावा.