अमळनेर(प्रतिनिधी) या वर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जातोय. म्हणून अमळनेर मतदार संघात ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने आज तहसीलदारांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, शेती हा पुर्णतः हवामानावर अवलंबुन असणारा व्यवसाय आहे. शेतकरी आपल्या हाता तोंडाशी आलेला घास वाचविण्यासाठी जिवाचे रान करीत असतो . कोरोनाचा संसर्ग, वादळ, खतांची टंचाई, बोगस बियाणे अशा नानाविध संकटांचा सामना करुन आपले शेत फुलवित असतो. त्यातच आता होणारी अतिवृष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांचे हाता-तोंडाशी असलेले मुंग, उडीद या पिकांचे तर नुकसान झालेच. त्यात कुठलेही उत्पन्न त्यास मिळाले नाही.
परंतु सद्या तालुक्यात होणाऱ्या अवकाळी अतिवृष्टीमुळे कापुस , मका , ज्वारी , बाजरी या पिकांवर सुध्दा खुप मोठा परिणाम झाला असून सर्व पिक पुर्णतः वाया गेली आहेत . तालुक्यात सतत होणाऱ्या पावसामुळे पिकांवर वेगवेगळया रोगांचा प्रार्दुभाव होवून पुर्ण पिके खराब झालेली आहेत . तरी तालुक्यातील हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहिर करुन भरीव मदत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यास दयावी याकरीता आपल्याकडे निवेदन देण्यात येत आहे.प्रांताधिकारी सीमा आहिरे,तहसीलदार मिलिंद वाघ यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शहराध्यक्ष उमेश वाल्हे,सरचिटणीस जिजाबराव पाटील, राकेश पाटील,विजयसिंग राजपूत,राहुल पाटील,प्रकाश पाटील,राहुल पाटील,मच्छीन्द्र राजपूत,शिवाजी राजपूत,अनिल जैन,राहुल चौधरी, निखिल पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.