अमळनेर (प्रतिनिधी) नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पहिल्यांदा ‘गूगल मिट’द्वारे घेण्यात आली. यावेळी ३४ विकासात्मक विषय मंजूर करण्यात आले. फक्त पालिकेच्या शाळा जिल्हा परिषदेला वर्ग करण्याबाबतचा विषय नागरिकांच्या मागणीमुळे नगराध्यक्षांच्या आदेशाने संस्थगित करण्यात आला.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी आपल्या कार्यालयातून तर मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड यांनी पालिकेतून बैठक नियंत्रण करून ‘गूगल मिट अॅप’द्वारे नगरसेवकांशी संवाद साधला. या बैठकीत भाजीपाला विक्रेत्यांसाठी खाजगी जागा अधिग्रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शहराचा २४ तास पाणी पुरवठा करण्याबाबत निविदा मागवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला . अमळनेर शहरासाठी आणखी एक पोलीस स्टेशनला मंजुरी मिळण्यासाठी पालिकेने जागा देण्याचा ठराव केला असून तो प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा , भुयारी गटारींसाठी पंपिंग स्टेशनला जागा देऊन मंजुरी देण्यात आली.
पिंपळे नाला सरळीकरणासाठी मंजुरी देण्यात आली. फेरीवाला धोरणाची अमलबाजवणी करून फेरीवाल्यांनी आत्मनिर्भर व्हावे म्हणून निधी अमलबजावणी बाबत आढावा घेऊन मंजुरी देण्यात आली. पालिकेत नगररचना विभागासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यासाठी निर्णय घेण्यात आला. दगडी दरवाज्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 1 कोटींच्या निधीची मागणी बाबत निर्णय घेण्यात आला. पालिकेच्या हद्दीतील जकात नाक्याच्या जागी झालेल्या अतिक्रमनाधारकास कारवाई प्रकरणी नोटीस देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासह विविध 35 विकासात्मक विषयांना मंजुरी देण्यात आली. सभा लिपिक महेश जोशी यांनी विषय वाचन केले. विशेष म्हणजे सर्व नगरसेवक ऑनलाईन बैठकीस हजर होते. लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी समारोप केला.