जळगाव (प्रतिनिधी ) । अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या राज्य सरचिटणीसपदी ग्रामगौरव प्रकाशनाचे समूह संपादक आणि ग्रामीण विषयावरील विश्लेषक विवेक ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
राज्याच्या ग्रामीण विकासात मोलाचे योगदान असणाऱ्या सरपंचांना संघटित करून शासन आणि गावकारभारी यांच्यातील दुवा म्हणून गेल्या १० वर्षांपासून राज्यभर प्रभावीपणे काम करणाऱ्या पंचायत राज विकास मंच संचालित अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या राज्य सरचिटणीसपदी विवेक ठाकरे यांची संघटनेचे संस्थापक आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका पत्रान्वये ही नियुक्ती जाहीर केली. विवेक ठाकरे हे मूळ रावेर तालुक्यातील निंभोरा गावाचे माजी उपसरपंच असून सद्या पुण्यातून ग्रामविकासाच्या योजनांसाठी कार्यरत ग्रामगौरव मासिक आणि ग्राम टीव्ही अशा डिजिटल मिडियाचे समूह संपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नियुक्तीचे संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शशिकांत मोरे, जळगाव जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन,सरचिटणीस पुरूजित चौधरी,राज्य संघटक गणेश पुजारी, रावेर तालुकाध्यक्ष प्रमोद चौधरी, राज्य संपर्क प्रमुख सचिन जगताप आदींनी स्वागत केले आहे.













