जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा दुध संघामध्ये झालेल्या चोरी प्रकरणी आज न्यायालयाने 156 (3) अन्वये चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे मला व संघाच्या चेअरमन, एम.डी. तथा संचालकांना ज्या न्यायासाठी शहर पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलनाला बसावे लागेल ती आमची मागणी योग्य होती हे सिध्द झाले असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी दिली आहे.
आमच्या अर्जानुसार गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनावर प्रचंड दबाव होता व पोलीस यंत्रणा पुर्णपणे प्रचंड दबावाखाली काम करीत होती. पोलीस प्रशासनाला आम्ही कायद्याच्या विविध बाबींचा हवाला देऊन आमची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याची विनंती वारंवार करूनही पोलीस प्रशासन आमची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करीत नव्हते. म्हणून आम्हाला लोकशाही मार्गाने ठिय्या आंदोलन त्यावेळेस करावे लागले होते. तरी सुध्दा दबावाला बळी पडून पोलीस यंत्रणा चोरीचा गुन्हा दाखल करीत नसल्याने आम्ही न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय त्यावेळेस घेऊन आमचे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते. न्यालयालयाच्या आजच्या निकालाने पोलीस प्रशासनाला कायदेशिर दणका बसला असून पोलीस प्रशासनाची पुर्ण अब्रु गेली आहे.
दुध संघात दुध उत्पादक शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने निवडून दिलेले संचालक मंडळ मागच्या काळात शासनाने राजकीय द्वेष बुध्दीने बरखास्त करून रातोरात प्रशासकीय मंडळ जाहिर केले होते. व त्या प्रशासक मंडळानेही रातोरात संघाचा प्रशासकीय ताबा मिळावा म्हणून दुध संघात रात्री जाऊन गदारोळ करून दबाव आणला होता. त्यावेळी सुड बुध्दीच्या राजकीय निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागितली होती तेव्हाही न्यायालयाने दुध संघाच्या संचालक मंडळ बरखास्तीचा व नविन प्रशासकीय मंडळाचा शासनाने घेतलेला निर्णय रद्द करून दुध संघाच्या संचालक मंडळाच्या बाजुने न्याय देऊन त्या निर्णयाबद्दल शासनावर ताशेरे ओढून जुने संचालक मंडळ कायम ठेवले होते.
शासनाने व सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी अशा प्रकारे द्वेष व सुड बुध्दीचे राजकारण सातत्याने सुरू केल्याने जनतेचा शासनावरील विश्वास दिवसेंदिवस कमी होत असून प्रत्येक गोष्टींचा न्याय मिळविण्यासाठी जनतेला न्यायालयात जावे लागत आहे ही सत्ताधाऱ्यांसाठी शर्मेची बाब आहे. सरकार किंवा सत्ताधारी नेत्यांच्या विरोधात कोणी गेले तर राजकीय सुडबुध्दीने व आकसाने ऐन-केन प्रकारे दबाव आणण्याचे प्रकार सध्या वाढलेले आहेत. कुठल्याही प्रकारे विरोधकांचा आवाज दाबून सुडबुध्दीचे राजकारण द्वेष भावनेतून केले जात आहे.
मी परवाच सांगितले होते की, मला एका पोलीस कर्मचाऱ्याच्या माध्यमातून खोट्या गुन्ह्यात अडकवून अटक करण्याचे षडयंत्र रचले जात आहे व मलाही माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली या सर्व गोष्टींवरून ही बाब ही सत्य असेल असे वाटते. जळगांव जिल्ह्यातील प्रत्येक निवडणूकीत विरोधकांपुढे मी उभा राहत असल्याने त्यांना निवडणूकीत विजय मिळविता येत नसल्याने परत ऐन-केन प्रकारे नाथाभाऊला अडकवा हा एक कलमी सुड बुध्दीचा कार्यक्रम विरोधकांकडून सातत्याने सुरू आहे. पण जळगांव जिल्ह्यातील जनता गेल्या 40 वर्षापासून मला ओळखते व पाहत आली असल्याने जिल्ह्यातील जनतेचा आशिर्वाद माझ्या मागे आहे.
आता तरी पोलीस दुध संघाच्या एम. डी. यांनी दिलेल्या फिर्यादी प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करतील व सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी न पडता या सर्व प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी व तपास करतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो व आज न्यायालयाच्या या निर्णयाने पोलीस प्रशासन व सुड-द्वेष करून राजकारण करणाऱ्यांना सणसणीत मिळालेली आहे. जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या किती दबावात काम करते हे ही सिध्द झाले आहे,असेही आमदार एकनाथराव खडसे यांनी म्हटले आहे.
















