बोदवड (प्रतिनिधी) संभाजी ब्रिगेडने ‘हर हर महादेव’,’वेडात मराठे विर दौडले सात” या चित्रपटांमधून सादरीकरण करतांना जाणून-बुजुन शिव इतिहासाची मोडतोड केली जात आहे. त्यामुळे या चित्रपटांचे चित्रपटगृहात होणारे सर्व शो बंद करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.
या चित्रपटांमधून छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांचा इतिहास जनमानसांत चुकीच्या पद्धतीने दाखवुन तमाम शिवभक्तांची मने दुखवली जात आहे. या चित्रपटांवर कायम स्वरुपी बंदी आणावी व या चित्रपटांचे चित्रपटगृहात होणारे सर्व शो बंद करण्यात यावे. अन्यथा संभाजी ब्रिगेड बोदवड कडून तालुक्यात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आज शुक्रवार रोजी दुपारी ३ वाजता तहसिल कार्यालय बोदवड यांचे माध्यमातून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना संभाजी ब्रिगेड व , शिवप्रेमी यांच्यावतीने बोदवड तहसिल कार्यालयात नायब तहसीलदार संध्या सुर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष शैलेश वराडे, संघटक गणेश सोनोने, उपाध्यक्ष गणेश मुलांडे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष दीपक खराटे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निवृत्ती ढोले, सचिव प्रशात सुरडकर, वैभव माळी, पवन पाटील, अँड. ईश्वर पाटील सामाजिक कार्यकर्ते संजय वराडे, कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सागर पाटील यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.