नागपूर (वृत्तसंस्था) औरंगाबादला संभाजीनगर, उस्मानाबादला धाराशीव आणि नवी मुंबई विमानतळाला दी बा पाटील यांचं नाव देण्यासंबंधी घेतलेले निर्णय रद्द केले असल्याचं खरं असेल, तर हे सरकार हिंदुत्वद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही. एवढेच नव्हे तर औरंगजेब नातेवाईक तुमचा कधीपासून झाला. औरंगजेब हा कोण लागतो, हा उस्मान कोण लागतो त्यांच्या नामांतराला स्थगिती का देता? असे प्रश्न शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी विचारले आहेत. संजय राऊत नागपूर दौऱ्यावर असून प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी टीका केली.
संजय राऊत म्हणाले की, हेच भाजपावाले औरंगाबादचं संभाजीनगर कधी करत आहात असं विचारत होते. उस्मानाबादसंबंधीही तीच भूमिका होती दी बा पाटील यांच्या नावासाठीही यांनीच मोर्चे काढले होते. उद्धव ठाकरेंनी केंद्राची तसंच कोणाचीही पर्वा न करता हिंमतीने एका हिंदुत्ववादी भूमिकेतून लोकभावनेचा आदर करत नामांतराचा निर्णय घेतला होता. जर फडणवीस आणि शिंदे गटाच्या सरकारने निर्णयाला स्थगिती दिली असेल तर यांच्यासारखे ढोंगी लोक नाहीत. हे सरकार बेकायदेशीर, घटनाबाह्य आहे. या सरकारला निर्णय फिरवण्याचा अधिकार नाही, कारण याबद्दलचा निर्णय़ सुप्रीम कोर्टात व्हायचा आहे,” असंही संजय राऊत म्हणाले आहेत. या सरकारच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार आहे. त्यामुळे त्यांचा मेंदू बधीर झालं आहे. त्यांना काम कराव वाटत नाही. त्यामुळे फक्त त्यांना स्थगिती स्थगिती. पण स्थगिती देतानाही त्यांनी आपला विवेक हरवला आहे. अशा शब्दात राऊतांनी शिंदे फडणवीसांवर टीकास्त्र सोडले. खरतंर स्थगितीबाबत फडणवीसांना विचारायला हवं कारण शिंदेंच्या हातात काहीच नाही. दी. बा. पाटीलांच्या निर्णयला त्यांनीदेखील पाठिंबा दिला होता. मग आता स्थगिती. मला वाटतं हे सरकार गोंधळलेल आहे.