मुंबई (वृत्तसंस्था) काही पोलीस अधिकारी लहान पक्षांच्या आमदारांना व अपक्षांना वेगवेगळ्या पद्धतीनं जाळ्यात ओढत होते. आमदारांचे कच्चे दुवे शोधून पहाटेच्या मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करत होते. गुप्तचर खात्यानंही याकामी विशेष कामगिरी बजावली. बहुमत सिद्ध करण्याची जबाबदारी शिरावर घेऊनच काही अधिकारी राबत होते,’ असा खळबळजनक आरोप शिवसेनेने केला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचे वक्तव्य फेटाळल्यानंतर शिवसेनेने ‘सामना’तून याच संदर्भात खळबळजनक आरोप केले आहेत. ‘देवेंद्र फडणवीस यांचे पहाटेचे सरकार वाचवण्यासाठी काही वरिष्ठ अधिकारी राबत होते. याआधीची पाच वर्षे भाजपने राज्यात एकछत्री अंमल गाजवला. तेव्हा राज्याच्या प्रशासनातील अनेक महत्त्वाच्या संघ परिवाराच्या शिफारशीने किंवा हस्तक्षेपाने होत. त्या काळात नेमलेला अधिकारी वर्ग फडणवीसांचेच सरकार पुन्हा येणार या धुंदीत होता. हाच वर्ग फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीनंतर सक्रिय झाला होता. मुख्यमंत्र्यांच्या मर्जीत राहता यावे म्हणून काही पोलीस अधिकारी लहान पक्षांच्या आमदारांना व अपक्षांना वेगवेगळ्या पद्धतीनं जाळ्यात ओढत होते. आमदारांचे कच्चे दुवे शोधून पहाटेच्या मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करत होते. गुप्तचर खात्यानंही याकामी विशेष कामगिरी बजावली. बहुमत सिद्ध करण्याची जबाबदारी शिरावर घेऊनच काही अधिकारी राबत होते,’ असा आरोप शिवसेनेने केला आहे. फडणवीसांचे सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न करणारे काही अधिकारी आजही उच्चपदी आहेत. सरकारला याच प्रवृत्तीपासून धोका असतो. त्यांच्यावर निगराणी ठेवणे हे गृहखात्याचे काम आहे. ते त्यांनी चोख पार पाडले तर सरकारचे भवितव्य उत्तम आहे.