नवी दिल्ली (प्रतिनिधी) मोदी सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांवरुन देशभरात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. महाराष्ट्र, पंजाब, हरियाणासह विविध राज्यांतील सुमारे २०८ संघटनांचा समावेश असलेल्या किसान संघर्ष समिती व किसान सभेने आज (शुक्रवार) भारत बंदची हाक दिली आहे. दरम्यान, पंजाबमध्ये रेल्वे ठप्प आणि मालवाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. तर बिहार, महाराष्ट्रातही आंदोलन केले जात आहे.
पंजाब आणि हरियाणातील शेतकरी कृषी विधेयकांविरोधात आंदोलनं करत आहेत. या दोन्हीही राज्यांमध्ये काँग्रेसने आधीच आंदोलनाला सुरुवात केली आहे. पंजाब हरियाणासह अनेक राज्यांमध्ये या विधेयकांवरुन शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. यामुळे सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शेतकरी नेत्यांच्या माहितीनुसार आज राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे रोको करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. भारतीय किसान यूनियन या संघटनेने या आंदोलनाला शेतकरी कर्फ्यू असे नाव दिले आहे. काँग्रेसचा आरोप आहे की, या विधेयकांमार्फत मोदी सरकार शेतकऱ्यांना कॉर्पोरेट जगतात अडकवत आहेत. यामुळे बाजारपेठेची व्यवस्था संपुष्ठात येईल आणि शेतकऱ्यांना एमएसपी उपलब्ध होणार नाही. दरम्यान, राज्यसभेमध्ये कुठल्याही चर्चेविना बिल पास झाले. देशाच्या संसदेत ही दुर्देवी घटना आहे की, अन्नदात्याशी संबंधिक तीन कृषी विधेयकं मंजूर करताना कुठलीही चर्चा झाली नाही आणि कुठलेही प्रश्न विचारु दिले नाहीत, असा शेतकरी संघटनेचा आरोप आहे. जर देशाच्या संसदेत प्रश्न विचारायचा अधिकार नाही तर सरकार महामारीच्या काळात नवी संसद बनवून जनतेच्या कमाईचे २०,००० कोटी रुपये वाया का घालवत आहे?, असा सवाल मोदी सरकारला शेतकरी संघटनांनी विचारला आहे.