धरणगाव (प्रतिनिधी) शिवारासह तालुक्यातील आनोरे, धनोरे, गारखेडे, वाघळुद, पिंप्री परिसरात पावसाने धुमाकूळ घातला असून खरिपाचे पिके जमिनदोस्त झालेली आहेत. कपाशी, मकाचे पीक पाण्याखाली गेले असून कापसाचे बोंड देखील सडू लागले आहे. कापसाच्या झाडावरील पूर्ण पाला गळून गेल्याने फक्त काळी उभी राहिली आहे. कैरी देखील सडू लागली असून एकरी दोन क्विंटल कपाशी देखील निघणे मुश्किल आहे. मकाचा कणसावरील दाणे देखील अति पावसामुळे खराब होऊ लागल्याने खरिपचा हंगाम वाया गेला आहे.
शिवारासह तालुक्यातील आनोरे, धानोरे, गारखेडे पिंप्री, वाघळूद परिसरात झालेल्या सततच्या पावसाने कपाशी पीक पुरते मातीमोल झाले आहे. त्यामुळे यंदा खरिपाचा खर्चही निघेनासा झाला आहे. तालुक्यात दररोज पाऊस कोसळत असल्याने कैर्या काळसर पडत असून सडू लागल्या आहेत. पाऊस पडत असल्याने जोरदार फटका बसला असून उत्पन्न घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरीपच्या हंगामाचे जेमतेम भांडवल निघते की काय, अशी भीती बळीराजाला वाटू लागली आहे. परिसरात पूर्वहंगामी कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. सततचा पाउस झाल्याने कपाशी लाल पडण्याला सुरूवात झाली असून लाल्या रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. मर व लाल्या पडल्याने एक दोन वेचणीतच कापसाचे पीक खाली होणार आहे. सततच्या पावसाने खरिपचा हंगाम वाया गेला असून बळीराजा चिंतीत आहे. कपाशी पिक हे खर्चिक असल्याने तसेच कमी प्रमाणात उत्पन्न येणार असल्याने शेतकरी पार निराश झालेला आहे. शेतात फक्त कापसाच्या काळ्या उभ्या असून फुलपात्या देखील गळून गेल्या आहेत.
















