जळगाव (प्रतिनिधी) ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पकडण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानंतर पुरवठा विभागाने कारवाई करत पंचनामा केल्यानंतर वाहनात २२ तांदळाच्या अतिरिक्त गोण्या आढळून आल्या.
या संदर्भात अधिक असे की, उमाळे येथे वसंत चिंधू धनगर यांनी स्वस्त धान्य दुकानाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे दुकान देव्हारी येथील रमेश पाटील यांच्या स्वस्त धान्य दुकानास जोडण्यात आले होते. सोमवारी दुपारी उमाळे येथील दुकानातून एक जण तांदळाच्या गोण्या वाहन (एमएच-१९, सीवाय-५६६२) मध्ये भरत असल्याचे अरुण कोळी यांना दिसले. त्यांनी याबाबत विचारणा केली असता जिल्हाधिकारी कार्यालयात माल मागवण्यात आल्याचे चालक राजू जनार्दन बिराडे याने सांगितले. परंतू अरुण कोळी यांना संशय आल्याने त्यांनी माजी उपसरपंच अनिल खडसे यांना माहिती दिली. त्यानंतर दोघांनी वाहनाचा पाठलाग करायला सुरुवात करत जिल्हाधिकारी राऊत यांना कळवले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीतात्काळ पुरवठा विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पुरवठा तपासणी अधिकारी दिगंबर जाधव, तलाठी व अन्य मंडळींनी कंडारी फाट्यावर जाऊन पंचनामा केला. त्यावेळी या वाहनात तांदळाच्या २२ गोण्या आढळून आल्या. तसेच हा माल जिल्हाधिकारी कार्यालयात मागवला नसल्याचेही स्पष्ट केले.