चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी. तसेच केळी पीक विमाचे पैसे त्वरित मिळावेत, अशा विविध मागण्यांचे भाजपच्या वतीने निवेदन तहसीलदार अनिल गावित यांना नुकतेच देण्यात आले.
गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून तालुक्यात अवकाळी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे ज्वारी, मका, कांदा ,कापूस, सोयाबीन, मूग व उडीद इत्यादी पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. सर्वच पिके कवडीमोल झालेले आहेत. तरी शासनाने त्वरित पंचनामाचे आदेश देऊन चोपडा तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने त्वरित आर्थिक मदत करावी, अशा आशयाचे निवेदन तहसीलदार अनिल गावित यांना देण्यात आले. यावेळी पंकज पाटील (तालुका अध्यक्ष), गजेंद्र जयस्वाल (शहराध्यक्ष), हिम्मतराव पाटील (संचालक शेतकी संघ), भरत पाटील (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती), धनंजय पाटील ( संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती ), तुषार पाठक , डॉ मनोहर बडगुजर , लक्ष्मण पाटील यांसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.