जळगाव (प्रतिनिधी) कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असतांना शहरातील आरटीओ कार्यालयाच्या आवारात आज दुपारी भयानक गर्दी पाहायला मिळाली. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्यामुळे कोरोनाचा पुन्हा विस्फोट होण्याचा धोका यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
लर्निंग लायसन्स, पक्के लायसन्ससाठी तसेच लायसन्स रिनिव्ह करणे, वाहन पासिंग करणे आदी कामांसाठी दररोज आरटीओ कार्यालयात शेकडो लोकं येत असतात. आज दुपारी वेगवेगळ्या खिडकींवर नागरिकांची झुंबड दिसून आली. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण राखणे कठिण होत आहे. मोठ्या गर्दीमुळे सोशल डिस्टनसिंगचा पार फज्जा उडाल्याचे चित्र आरटीओ कार्यालयात बघायला मिळाले. याठिकाणी अनेक जण बिना मास्क बिधास्तपणे फिरत दिसून आलेत. एकाच ठिकाणी गर्दी करून नागरिक एक प्रकारे कोरोनाला आमंत्रित करीत असल्याचे चित्र होते. परंतू शासकीय कार्यालयाच्या आवारात सरकारने दिलेल्या दिशानिर्देशाचे उल्लंघन होत असतांना, कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी बघ्याची भूमिका कशी घेऊ शकतात?, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.