जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा दूध संघाचा वाद मंगळवारी रात्री थेट पोलिस ठाण्यात पोहला होता. बरखास्त संचालक मंडळाने अनधिकृतपणे बैठक घेतल्याचा आरोप करत गिरीश महाजन गटाचे प्रशासक अरविंद देशमुख यांनी थेट पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंसह इतर 11 जणांविरुद्ध प्रशासक मंडळाने पोलिसात तक्रार दिली आहे.
अरविंद देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संचालक मंडळ बरखास्त असतांनाही मंदाताई खडसे यांच्यासह त्यांच्या संचालक मंडळातील ११ संचालकांनी जिल्हा दूध संघाच्या आवारात बेकायदेशीररित्या प्रवेश करुन दूधसंघाच्या मिटींग हॉलमध्ये बैठक घेतली. यापुढे संचालक मंडळाने बेकायदेशीररित्या प्रवेश केल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होवून गुन्हा घडल्याची शक्यता अरविंद देशमुख यांनी तक्रारीव्दारे व्यक्त केली आहे. तसेच संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असाही तक्रारीत उल्लेख आहे.
कोट्यवधी रुपयांचा घोटाळा
दूध संघात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार दूध संघाचे माजी कर्मचारी नागराज जनार्दन पाटील यांनी शासनाकडे केली होती. त्यामुळे जर्नादन पाटील यांच्या यांच्या तक्रारीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, या प्रकरणी चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.
नागराज पाटील यांचे गंभीर आरोप
दूध संघाच्या संचालक मंडळासह कार्यकारी संचालकांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याची तक्रार नागराज पाटील यांनी केली होती. त्यांच्या या तक्रारीमुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले होते. नागराज पाटील यांनी दूध संघावर गंभीर आरोप केले होते.या तक्रारीवरूनच जळगाव जिल्हा दुध संघातील कथित गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी शासनाकडून राज्य शासनाचे उपसचिव एन. बी. मराळे यांनी चौकशी समिती गठित करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी समितीत 5 अधिकाऱ्यांचा समावेश असून 20 ऑगस्ट पर्यंत चौकशी करून तो अहवाल राज्य शासनाला देण्याचे आदेश दिले गेले आहे. दरम्यान, दूध संघाची जुनी कागदपत्रे जाळण्यात आली होती, असाही आरोप करण्यात आला होता. त्यामुळे शासनाने आता चौकशी समिती गठीत केली असल्याने एकनाथराव खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.