जळगाव (प्रतिनिधी) महाविद्यालयात परीक्षा देऊन घरी निघालेल्या मनस्वी सुभाष सोनवणे (२१, रा. चंदूअण्णा नगर) या विद्यार्थिनीचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी शिवकॉलनी उड्डाणपूलावर घडली होती. याप्रकरणी मयत विद्यार्थिनीच्या भाऊ नचिकेत सोनवणे याच्या फिर्यादीवरून डंपर चालकाविरूध्द रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
मनस्वी उर्फ ताऊ सुभाष सोनवणे ही शहरातील आयएमआर महाविद्यालयात बॅचलर ऑफ बिझिनेस ऍडमिनिस्ट्रेशन (बीबीए)च्या तृतीय वर्षाला नियमित शिक्षण घेत होती. त्यासोबतच ती सीए फाउंडेशनचा कोर्सही करत होती. दरम्यान,बीबीएच्या अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाची परीक्षा देऊन घरी मनस्वी ही भावासह मोपेड दुचाकी (एमएच १९ सी ७१६९) वरून घरी जात होती.
यादरम्यान, राखेने भरलेला (एमएच १९ सीवाय ३३११) या क्रमाकांच्या या डंपरने जळगावकडून धुळ्याकडे जात असताना महामार्गावरील शिव कॉलनी परिसरातील रेल्वे उड्डाणपूलावर भाऊ बहीण जात असलेल्या मोपेड दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील मनस्वी ही तरुणी रोडवर पडली, तिच्या डोक्यावरुन डंपरचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, तर तरुणीचा भाऊ नचिकेत सुभाष सोनवणे (वय २५ रा. खोटे नगर, जळगाव) हा थोडक्यात बचावला आहे. दरम्यान, मनस्वी ही गर्जना या युवकांच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष सोनवणे यांची मुलगी आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी राखाने भरलेला डंपर ताब्यात घेतला असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात याप्रकरणी मयत विद्यार्थिनीच्या भाऊ नचिकेत सोनवणे याच्या फिर्यादीवरून डंपर चालकाविरूध्द रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.