लखनऊ (वृत्तसंस्था) बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात तब्बल २८ वर्षानंतर विशेष न्यायालयात आज निर्णय सुनावला जाणार आहे. या प्रकरणात भाजपाचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह एकूण ३२ आरोपींवर आज लखनौचे सीबीआय न्यायालय निर्णय देणार आहे.
६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर फैजाबादमध्ये दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या. यातील एक एफआयआर लाखो कारसेवकांविरोधात दाखल करण्यात आली होती तर दुसरी एफआयआर संघाच्या कार्यकर्त्यांसहीत लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, तत्कालीन शिवसेना नेते बाळ ठाकरे यांच्याविरोधात दाखल करण्यात आली होती. तसेच सुधीर कक्कर, सतीश प्रधान, राम चंद्र खत्री, संतोष दुबे आणि ओम प्रकाश पांडे, कल्याण सिंह, उमा भारती, रामविलास वेदांती, विनय कटियार, प्रकाश शरण, गांधी यादव, जय भानसिंग, लल्लू सिंह, कमलेश त्रिपाठी, बृजभूषण सिंह, रामजी गुप्ता, महंत नृत्य गोपाल दास, चंपत राय, साक्षी महाराज, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला, धर्मदास, जय भगवान गोयल, अमरनाथ गोयल, साध्वी ऋतंभरा, पवन पांडे, विजय बहादुर सिंह, आरएम श्रीवास्तव आणि धर्मेंद्रसिंग गुजर हे देखील या प्रकरणात आरोपी आहेत. दरम्यान, निकालाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतही हायअलर्ट जारी करण्यात आलाय. डीआयजी दीपक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआयडी, एलआययूच्या टीम साध्या वेषात तैनात करण्यात आल्या आहेत.