मुंबई (वृत्तसंस्था) मराठा आरक्षणावर सरकारने काही केले तर ठीक, नाहीतर राजकारणाला रामराम करणार, राजीनामा देऊन टाकणार. मी मनापासून बोलतोय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तर मी देणारच, अशा शब्दात भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणा बाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
एबीपी माझाशी साधलेल्या संवादात उदयनराजे भोसले पुढे म्हणाले की, इतर समाजांप्रती मला आदर आहे. मात्र प्रत्येकाला त्यांचा हक्क मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे. न्यायालयाने सर्वांना समान अधिकार द्यावेत. न्याय मिळाला नाही तर उद्रेक होणार हे स्वाभाविक आहे. मराठा आरक्षणावर सरकारने काही केले तर ठीक, नाहीतर राजकारणाला रामराम करणार, राजीनामा देऊन टाकणार. मी मनापासून बोलतोय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तर मी देणारच. फक्त मराठा समाजासाठीच नाही इतर कोणावर अन्याय होत असतील तर त्यांच्यासाठीही लढणार. कोणावर अन्याय झाला आणि वेळ आली तर राजीनामा देणार. काय होत नसेल तर पदावर राहून काय उपयोग?, असेही उदयनराजे म्हणाले.