नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिल्ली दंगल प्रकरणात जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला अटक केली आहे. उमर खालिदला बेकायदा कृत्यरोधी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ११ तासांच्या दीर्घ चौकशीनंतर खालिदला अटक केली. दिल्ली दंगली प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रान्चने २ सप्टेंबर रोजीही काही तास उमर खालिदची चौकशी केली आहे. त्याआधी पोलिसांनी दंगलीशी संबंधित आणखी एका प्रकरणात उमर खालिदविरोधात यूएपीए कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला होता. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रान्चनेही दंगलीचा कथित कट रचल्याप्रकरणी उमर खालिदची चौकशी केली होती. त्याचा फोनही जप्त केला होता. पुढील काही दिवसांत दिल्ली पोलिस उमर खालिदच्या विरोधात चार्जशीट दाखल करु शकते. आज, सोमवारी खालिदला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. उमर खालिदच्या अटकेनंतर ‘युनायटेड अगेन्स्ट हेट ग्रुप’ने एक निवेदन जारी केले आहे. ‘११ तासांच्या चौकशीनंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने उमर खालिदला दिल्ली दंगल प्रकरणातील सूत्रधार म्हणून अटक केली आहे. दिल्ली पोलिस हिंसाचाराच्या तपासाच्या नावाखाली हिंसक आंदोलनांना चालना दे आहेत’, असे युनायटेड अटेन्स्ट हेटने म्हटले आहे.