मी चाळीस वर्षे भाजपची सेवा केली. पक्ष लहानाचा मोठा केला आणि जेंव्हा सत्ता मिळाली तेंव्हा अलगद उचलून बाजूला टाकले. चहामधून माशी काढतात तसे… मी ओबीसी होतो म्हणून का? तर मग तुम्ही ओबीसीवर अन्याय केला. मी असा काय केला गुन्हा? माझे मंत्री पद काढून घेतले. अरे,मी काय चूक केली? ते तरी सांगा…कोणीतरी सांगा रे !. चंद्रकांतदादा,रावसाहेब, देवेंद्र,कोणीतरी सांगा रे ! मी काय केला गुन्हा?.
नाथाभाऊ, ज्याचा हात बुटाखाली दाबला जातो ना, त्यालाच वेदना होतात. जो बुट ठेवतो त्याला वेदना होत नाहीत. तोच उलट विचारतो,आता कसे वाटते? अजित, प्रेम चोपडा, अमरिश पुरी,खरबंदा सारखे. याचा अनुभव तुम्हाला आहे तसा आम्हाला ही आहे. ज्या वेदना तुम्हाला झाल्या त्या आम्हाला ही झाल्या. पण कधी हात तुमचा होता आणि बूट फडणवीस यांचे होते.तर कधी बूट तुमचे होते आणि हात आमचा होता.
दानशूर कर्णाचा रथ जमीनीवर दोन अंगुळेवर चालत होता. पण कुरूक्षेत्रावर लढाईत कौरवांची बाजू घेतल्याने जमीनीवर चालू लागला आणि जमीनीत रूतला. तेंव्हा तो समोर अर्जुनाला म्हणाला, ” हे पार्था थांब. माझा रथ जमीनीत रूतला आहे. मी रथावरून खाली उतरलो आहे, रथाचे चाक जमीनीवर काढण्यासाठी. तर मी निशस्र आहे. निशस्र योद्धावर बाण मारणे अधर्म आहे. असा अधर्म करू नकोस.
तेंव्हा अर्जुन थांबला. पण सारथी श्रीकृष्ण म्हणाले,”राधासुता ,तेंव्हा कुठे गेला होता तुझा धर्म? तुम्ही भिमाला विष पाजून डोहात टाकले. तुम्ही द्रौपदीचे भर सभेत वस्रहरण केले. पांडव वाड्यात असताना त्यांचा वाडा जाळला. तेंव्हा धर्म आठवला नाही का?” हे ऐकून कर्ण निरूत्तर झाला. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले,” हे पार्था,कर्णा ने धर्म कधीच सोडला आहे. आता धर्माची आठवण करून काहीच उपयोग नाही. अधर्माला अधर्मानेच उत्तर दिले पाहिजे. तू मार बाण !”
नाथाभाऊ ,आपण महसूल मंत्री, जळगावचे पालकमंत्री होते. जिल्हा परिषदमधील भ्रष्टाचाराची तक्रार घेऊन आम्ही तुमच्याकडे तीन वेळा पत्र दिले. भेटण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला वेळ नव्हता. कारण झेडपीच्या भ्रष्टाचार्य सीईओ आस्तिक पांडेंना घेऊन तुम्ही सभेत मिरवत होते. का प्रेम होते सीईओ पांडेवर? तुम्ही तर आमचे आमदार होते. पांडेचे नाही !
तुमच्या शिवरामनगर मधील बंगला तथा संपर्क कार्यालयात रेतीमातीचे मक्तेदार गर्दी करीत होते. म्हणून कि काय आमच्या तक्रारीकडे बघायला, वाचायला, भेटायला तुम्हाला फुरसत नव्हती. नाईलाजाने आम्ही ठरवले की, यांचे रेतीमातीचे देणेघेणे संपेपर्यंत आपण घराच्या समोर रस्त्याच्या पलिकडे थांबू. आम्ही कधीच नोटांकडे लक्ष दिले नाही. कोण किती देते याची चौकशी केली नाही. पण भेटल्याशिवाय जायचेच नाही.
नाथाभाऊ तेंव्हा तुमचा सत्तेचा रथ जमिनीवर चार अंगुळेवर चालत होता. आणि आम्ही जमीनीवर होतो. म्हणून कदाचित भेट झाली नसेल. खाली मान वाकवून पाहाणे जमले नसेल. म्हणून आम्हाला हाकलून लावण्यासाठी तुम्ही लाल डोळ्यांची लठ्ठ माणसे पाठवली. त्यांनी पोलिसांना न जुमानता आमचा खिमा करायचे सुरू केले. पण पोलिसांनी उचलून रिक्षात घालून पळवले. पोलीस म्हणाले, काका जान बची लाखो पाये. बचेंगे तो और भी लढेंगे !
नाथाभाऊ हे सर्व तुम्हाला कळले नसेल का? जाणवले नसेल का?कुठेही वेदना किंवा संवेदना झाली नसेल का? नाही झाली. कारण बूट तुमचा होता.आणि हात आमचा होता. चार महिन्यांनी नाथाभाऊ तुमच्या मागे सादरे आत्महत्याचे भूत लागले. दाऊदकडची कोणी चुरड लागली. भोसरी एमआयडीसीची धुरळ उडाली. आणि तुमचे पुण्य संपले. मंत्रीपद काढून घेतले. रथ जमीनीवर उतरला. आता बूट मुख्यमंत्रीचा होता. आणि हात तुमचा होता. कळ लागली असेल ना ! वेदना झाली असेल ना ! तुम्ही फक्त रडत राहिले, ओरडत राहिले, “अरे…मी काय गुन्हा केला?. “भाजपचा कोणताही दत्तात्रय दिसला कि तुम्ही तेच तेच बोलतात.” सोड रे दत्त्या !”
भाजपचा दत्त्या म्हणतो,” आम्ही तुम्हाला चार वर्षांपासून सोडले आहे. तुम्हीच दत्त्याला सोडून जात नाहीत.” आता आम्ही विचारतो, ” नाथाभाऊ,तेंव्हा कुठे गेला होता तुमचा धर्म?” नाथाभाऊ, तुमचे मंत्रीपद काढून घेतल्यावर, पगडी, तलवार जमा केल्यानंतर आम्ही दोन वेळा तुमच्या भेटीला आलो. तुम्ही भेटले, बोलले, फुरसत होती. का? एक ही रेतीमातीचा चोर जवळपास दिसत नव्हता. आता तुमचा रथ जमीनीवर होता. तुम्हाला धर्म कळत होता. मनात पुटपुटलो,” नाथाभाऊ, तेंव्हा कुठे गेला होता तुमचा धर्म?”
गुलाबराव पाटील जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री बनले. आम्ही पाळधी मुक्कामी भेटायला गेलो. त्यांनी बरोबरीने अलिंगण दिले. आम्ही गहिवरलो. साधा माणूस जितका मोठा झाला तितकाच नम्र बनला. अदब काय असते, ती दाखवली. आणि तुमची आठवण झाली. मी म्हणालो, ” नाथाभाऊ, तेंव्हा कुठे गेला होता तुमचा धर्म?”
जळगाव जिल्हा जागृत जनमंचचे शिवराम पाटील यांच्या फेसबुक वॉलवरून साभार
(मो. ९२७०९६३१२२)
(लेखक वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत.)
सूचना : या लेखात व्यक्त केले गेलेले विचार लेखकाचे स्वतःचे विचार आहेत. या लेखातील टीका, टिप्पणी, अथवा सत्यतेप्रती ‘क्लिअर न्यूज’ उत्तरदायी नाहीय. या लेखातील सर्व मुद्दे जशीच्या तशी घेण्यात आली आहेत. या लेखातील कोणतीही माहिती अथवा व्यक्त करण्यात आलेले विचार ‘क्लिअर न्यूज’चे नाहीत.