जळगाव (प्रतिनिधी) व्यावसायिक भागीदाराला आपल्याच पत्नीवर अत्याचार करण्यास मदत करणाऱ्या पतीला आज सकाळी अटक करण्यात आली आहे. मित्र आरोपी मात्र अद्याप फरारच असून रामानंद पोलीसांचे पथक त्याच्या मागावर आहेत.
रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांना मुख्य संशयित आरोपी पती हा जळगावातून पसार होत असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी पोउनि संदीप परदेशी, तुषार विस्पुते, स्वप्निल निकुंभ, भुषण पाटील, रूपेश ठाकरे, विजय जाधव यांचे एक पथक तयार केले. त्यानुसार आज सकाळी १०.३० ते ११ वाजेच्या सुमारास बसस्थानकातून मुख्य संशयित आरोपी पतीस अटक केली. तर दुसरा आरोपी रमेश काकडे अद्याप फरारच आहे.
नेमकी काय आहे घटना
याबाबत पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय ठप्प झाल्याने पतीने मित्र रमेश काकडे (रा. प्रल्हादनगर, पिंप्राळा हुडको) याच्यासोबत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला.सोबत भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला. परंतू घराच्या परिसरात भाजीपाला विक्री करण्यास लाज वाटत होती. त्यामूळे पतीने प्रल्हादनगर पिंप्राळा हुडको येथील मित्राच्या भाड्याच्या घरात राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ८ जूनला पतीने आपल्या पत्नीला मित्रासोबत शरीर संबंध ठेवण्यास सांगितले. परंतू पत्नीने नकार दिल्यावर त्याने तिला पुन्हा मुलांना ठार मारण्याची आणि स्वतः आत्महत्या करण्याची धमकी दिली. थोड्यावेळानंतर त्याने बाहेरून एक कोल्ड्रींक्स आणत पत्नीला पाजले. विवाहितेला चक्कर यायला लागल्याचा फायदा घेत दोघांनी तिला बाथरूममध्ये नेले. त्याठिकाणी पतीने पत्नीचे हात पकडून ठेवत मित्र रमेशला अत्याचार करायला सांगितले.एवढेच नव्हे तर सर्व प्रकाराचा व्हिडिओ देखील तयार केला आणि कुणालाही काही सांगितले तर मुलांना ठार मारण्याची आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
तब्येत खराब झाल्यामुळे पिडीत विवाहिता १७ जुलैला माहेरी गेली. यावेळी पिडीतेने आपल्या घरच्यांना सर्व हकीगत सांगितली. घरच्यांनी धीर दिल्यानंतर माझा पती व त्याचा मित्राविरोधात फिर्याद दिल्याचे पिडीत महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. रामानंद पोलिसांनी पिडीत महिलेच्या पतीसह त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, दोघं आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.