जळगाव (प्रतिनिधी )। नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीत मतदानासाठी जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करावा असे असे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी अमन मित्तल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असून ३० जानेवारी रोजी सकाळी ८.00 ते दुपारी ४.00 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणूकीसाठी मतदान करतांना मतदारांनी मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करावा इतर कोणताही पेन, पेन्सिल, बॉल पॉईंट पेन किंवा अन्य साहित्याचा वापर करु नये, असे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी अमन मित्तल यांनी कळविले आहे.
पसंतीक्रमानुसार होणार मतदान
निवडणूकीसाठी मतदान हे पसंतीक्रमानुसार असल्याने पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात १ हा अंक लिहून मतदान करावे, १ हा अंक फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर लिहावा, यापुढील पसंतीक्रम जसे २,३,४… नोंदविणे ऐच्छिक आहे. जेवढे उमेदवार निवडणूक लढवित आहेत त्या सर्वांचे संख्येइतके पसंतीक्रम मतदारास नोंदविता येतील, मतपत्रिकेवर नमुद करावयाचा पसंतीक्रम केवळ अंकांमध्ये व एकाच भाषेत (देवनागरी, इंग्रजी, रोमन किंवा राज्य घटनेतील आठव्या परिशिष्टामध्ये नमुद कोणतीही इतर भारतीय भाषा) नमुद करावयाचा आहे. (उदा. १,२,३,४,५ किंवा 1,2,3,4,5 किंवा I,II,III,IV,V) असा पसंतीक्रम नोंदवावा. शब्दात (एक, दोन, तीन…. इ.) असे लिहू नये, आपल्या पसंतीच्या उमेदवारापुढे “X” किंवा ‘√’ अशी खुण करु नये, मतपत्रिकेवर नाव/कोणताही शब्द, सही/ अंगठा करु नये. असेही सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ, नाशिक अमन मित्तल यांनी कळविले आहे.