जळगाव (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील शहापूर येथे पाचशे रुपयाच्या बनावट नोटा खऱ्या म्हणून दैनंदिन व्यवहारात वापरणाऱ्या एकाला आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. शेख फारुख शेख नवाब (वय ४० रा. शहापूर जामनेर) असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.
यासंदर्भात अधिक असे की, स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक बापू रोहम यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, शहापूर तालुका जामनेर येथे शेख फारुख शेख नवाब हा व्यक्ती पाचशे रुपयाच्या भारतीय चलनी नोट खरी म्हणून व्यवहारात वापरत आहे. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज शहापूर शिवारातील एका शेतातून शेख फारुख शेख नवाबला पाचशे रुपयाच्या २६,५०० रुपये दराच्या ५३ बनावट भारतीय चलनी नोटा जवळ बाळगताना अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध भादवि कलम ४८९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनानुसार आरोपी शेख फारुखला अधिक चौकशी करून जामनेर पोलीस स्थानकात पुढील तपास कामी हजर करण्यात आले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुधाकर लहारे पोहे का सुनील दामोदर विजय पाटील नंदलाल पाटील सचिन महाजन भगवान पाटील यांनी केली.