जळगाव (प्रतिनिधी) पाळधी येथील लक्ष्मीनारायण पलोड यांच्या मालकीचे पलोड डीस्ट्रीब्युटर्समधून २३ लाख २० हजार ५७० रुपयांचे टायर, साहित्य व रोकड चोरून नेणाऱ्यापैकी मुख्य संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उस्मानाबादमधून अटक केली आहे. अनिल बिसाराम शिंदे (४५, रा.तेरखेडा, ता.वाशी, जि.उस्मानाबाद) असे चोरट्याचे नाव असून पुढील तपासासाठी त्याला धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पाळधी येथील लक्ष्मीनारायण पलोड यांच्या मालकीचे पलोड डीस्ट्रीब्युटर्स नावाच्या गोडाऊनमधून ९ सप्टेबरच्या मध्यरात्री १ वाजता अज्ञान चोरट्यांनी गोडाऊनमधील नवीन टायर, रेडीयल व ११ हजार रुपयांची रोकड असा २३ लाख २० हजार ५७० रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. यातील केवळ एका चोरट्याचे चित्रण सीसीटीव्ही कॅमेरात चित्रीत झाले होते. त्यावरुन पोलिसांनी स्केच तयार केले. संशयिताची माहिती देणाऱ्यास ५१ हजार रुपयांचे बक्षीस पोलिस दलाने जाहीर केले होते. दरम्यान, या प्रकरणात पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुढे यांना चोरट्याबाबत गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार डॉ. मुंढे यांनी उस्मानाबाद पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांच्याशी संपर्क साधून चोरट्याबाबत माहिती घेतली. माहिती पक्की असल्याचे खात्री होताच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू राहोम, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक, रामकृष्ण पाटील, सुधारक अंभोरे, जितेंद्र पाटील, अशरफ शेख, अनिल देशमुख, इद्रीस पठाण, विजय पाटील, नरेंद्र वारुळे यांचे पथक रवाना केले. या पथकाने शिंदे याला तेरखेडा या त्याच्या गावातून अटक केली. दरम्यान, या गुन्ह्यातील शिंदेसोबत असलेले आणखी पाच ते सहा चोरट्यांचा पोलिस शोध घेत आहेत.